राज्यातील २७ बँकाकडे असलेल्या २७७१ कोटी रूपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्हं बँक स्वीकारणार, महसुलमंत्र्याची माहिती
By admin | Published: June 21, 2017 02:30 PM2017-06-21T14:30:15+5:302017-06-21T14:41:41+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : राज्यातील २७ जिल्हा बॅकांकडे रद्द झालेल्या १००० व ५०० रूपयांच्या जुन्या २७७१ कोटी रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदीला दाखविला असल्याची माहिती राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आॅनलाइन लोकमतशी बोलताना दिली़ राज्यातील शेतकऱ्यांना घोषित झालेल्या कर्जमाफीच्या तोडावर हा निर्णय झाल्याने राज्य सरकारने केंद्राचे व रिझर्व्ह बँकेचे आभार मानल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले़
रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे राज्य सरकारला कळविताच मुंबईला राष्ट्रीयकृत बँकांची तातडीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविली़ या बैठकीला जाण्यासाठी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले़ यावेळी त्यांच्यासमवेत सहकार, पणन व वस्त्रोउद्योगमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पोलुीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते़
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. राज्यातील बँकांकडे पडून असलेल्या नोटांची पुरेशी तपासणी करून त्या स्विकारण्यासाठी मान्यता मिळाल्याने कर्जमाफीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे आपण आभार मानतो.
१० हजार रूपयांचे अग्रीम कर्ज देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही अनेक बँका टाळाटाळ करीत आहेत. त्याकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कलम ८९ नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज देणे क्रमप्राप्त आहे. हे कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल. या बँकांकडे पैसा नसेल तर त्यांनी तो राज्य सहकारी बँकांना मागावा. या पतपुरठ्याची हमी राज्य सहकारी बँकांनी दिली आहे, याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.