कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२० रोजी भारतात टाळेबंदी जाहीर झाली. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांचे हातगाडे, ढाबे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे तेलाच्या विक्रीमध्ये घट झाली. परिणामी खाद्यतेलाचे दर स्थिर राहिले. नंतर शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. त्यामुळे हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, छोटे समारंभ यांना काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे घटलेल्या खाद्यतेलांच्या मागणीत वाढ झाली. याच काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल यांसह इतर तेलबियांचे नुकसान झाले. याचा परिणाम म्हणून तेलाच्या उत्पादनात घट झाली.
भारतामध्ये अशी परिस्थिती असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही घडामोडी घडल्या. मलेशियाने तेलावर निर्यात कर दीड टक्के वाढवत आठ टक्क्यांवर नेला. इंडोनेशियाने पामवरील आधारभूत किंमत एक ते दीड टक्के वाढविली आणि त्या देशातील उत्पादनही घटले. वाढत्या कोरोनामुळे अर्जेंटिना, ब्राझील येथे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे तेल उत्पादक कंपन्या बंद होत्या. लॉकडाऊननंतरही कामगारांच्या संपामुळे तेथील सोयाबीन तेल कंपन्या बंद होत्या. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेलाचे उत्पादन घटले. तसेच युक्रेनमधून येणाऱ्या सूर्यफूल तेलाची आवक घटली, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक महेश बाफना यांनी व्यक्त केले.
अशा विविध कारणांमुळे खाद्यतेलाची आयात आणि उत्पादन कमी झाले. या तुलनेत मागणीमध्ये वरचेवर वाढ होत आहे.
कोट ::::::::::::
घरात स्वयंपाकासाठी वापरायच्या सर्वच किराणा मालाच्या दरात वाढ होत आहे. महागाई असाहाय्य झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव मध्यमवर्गीयांना परवडणारे नाहीत. यामुळे हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
- ज्योती खळदे
गृहिणी, बार्शी