सुजल पाटील
सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अडकून राहिलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून ३० विशेष श्रमिक रेल्वे धावल्या. यातून ३४ हजार ७६१ प्रवासी स्वत:च्या राज्यात पोहोचू शकले. यामध्ये सोलापूर स्थानकातून ४ गाड्या, कुर्डूवाडी स्थानकातून १ गाडी, पंढरपूर स्थानकातून ४, कलबुर्गीतून ३, दौंडमधून ४, अहमदनगरहून ८ तर शिर्डी स्थानकातून ५ आणि पुणे विभागातून एक अशा रेल्वे गाड्या महिनाभरात रवाना झाल्या.
यावेळी रेल्वेकडून शासकीय यंत्रणेच्या साह्याने उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमधील रोजगार, शिक्षण आणि पर्यटनासाठी आलेल्या परप्रांतीय प्रवाशांना रेल्वेच्या विशेष श्रमिक एक्स्प्रेसच्या आॅपरेशनमुळे स्वगृही जाता आले. यातून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला तब्बल २३ कोटी ५९ लाख ८ हजार १९२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांची गैरसोय होऊ लागली होती. त्यातच परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी परतीची वाट धरली होती. अनेक जण पायी रस्त्याने चालू लागले होते. त्यांच्यासाठी सरकारने एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचवेळी रेल्वेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने मध्य रेल्वे विभागात विशेष श्रमिक ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. याच धर्तीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाच्या मदतीने परप्रातीयांना त्याच्या राज्यात पोहोच करण्याचे काम केले. प्रारंभी रेल्वेच्या वाणिज्य विभागापासून ते तिकीट तपासणी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांनी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी, तिकीट तपासून रेल्वे बोगीमध्ये सोडण्याची व्यवस्था केली होती.
अशी आहे स्टेशननिहाय प्रवासी संख्या अन् उत्पन्न स्टेशन प्रवासी उत्पन्न
- - सोलापूर ५०५४ - ३ कोटी ५३ लाख १ हजार ६२
- - पंढरपूर ४३७० - ३ कोटी १२ लाख ७ हजार ७७०
- - दौंड ४१३६ - २ कोटी ८६ लाख ६ हजार ४४०
- - अहमदनगर ९७४९ - ६ कोटी १२ लाख १६०
- - शिर्डी ५८४३ - ३ कोटी ६४ लाख ९ हजार ८५५
- - कलबुर्गी ३९३३ - ३ कोटी १६ लाख ३ हजार ३२५
- - कुर्डूवाडी १२३६ - ८ लाख ९ हजार ५८०
- - पुणे ४४० - ३ लाख ३० हजार
- - एकूण ३४७६१ - २३ कोटी ५९ लाख ८ हजार १९२
- शासनाने दिले पैसे...
- या प्रवाशांना रवाना करण्यासाठी तिकिटाची व्यवस्था मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आली. परप्रांतीय आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास २४ तासांहून अधिक कालावधी लागत असल्यामुळे प्रवाशांच्या पोटभर खाण्याची आणि शुद्ध पाणी देण्याची व्यवस्थाही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली होती. यात सामाजिक संस्था, संघटनांचाही मोलाचा वाटा होता.
लॉकडाऊन काळात प्रवासी रेल्वे गाड्या बंद असतानाही सामाजिक भावनेतून भारतीय रेल्वे प्रशासनाने विशेष श्रमिक ट्रेनसह अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक, पार्सल गाड्या चालविल्या. यातून कसेबसे रेल्वेला उत्पन्न मिळाले. श्रमिक ट्रेनमधील सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने खूप सहकार्य केले.- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग