लऊळमधील दांपत्यांचे ४० किलोमीटर लोटांगण; जाणून घ्या नेमकं कारण काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:43 PM2021-06-16T12:43:41+5:302021-06-16T12:49:42+5:30
जगाला कोरोनामुक्त कर अन् विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यासाठी साकडे
सोलापूर - पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी व वारीसाठी शासनाने या वर्षीही बंधने घातली आहेत. त्यामुळे जगाला कोरोना मुक्त कर, श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं करावं, पायी वारीला परवानगी द्यावी आदी मागण्यांसाठी अन् विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी मोडनिंब (ता. माढा) येथील विठ्ठलभक्त नागनाथ कोळी आणि त्यांची पत्नी जयश्री कोळी हे दांपत्य लऊळ येथून लोटांगण घालत पंढरपूरकडे निघाले आहेत.
कोळी दांपत्याने संत कूर्मदास महाराजांचे दर्शन घेऊन आपला संकल्प सोडला आहे. लऊळ ते पंढरपूर हे 40 किलोमीटरचे अंतर दंडवत घालीत 5 दिवसांत पूर्ण करणार आहेत. मंगळवारी (ता.15) जून रोजी त्यांनी प्रस्थान ठेवले आहे. त्यांच्या संकल्पात भाविकांनी बाधा आणू नये, कोणीही गर्दी करु नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कोळी यांनी केले आहे.