जनावरांच्या बाजारात ५० लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:44+5:302020-12-28T04:12:44+5:30
जनावरांचा बाजार सुरू झाल्याने बाजारावर अवलंबून असलेल्या सर्वच उद्योग, व्यवसायांना चालना मिळाल्याने व्यापारी, दुकानदार, चहा विक्रेते, हाॅटेल व्यावसायिक, ...
जनावरांचा बाजार सुरू झाल्याने बाजारावर अवलंबून असलेल्या सर्वच उद्योग, व्यवसायांना चालना मिळाल्याने व्यापारी, दुकानदार, चहा विक्रेते, हाॅटेल व्यावसायिक, रसपानगृह चालक, वाहन चालक-मालकातून समाधान व्यक्त होत आहे.
अगोदर कोरोना संकटामुळे व त्यानंतर लम्पी स्किन आजारामुळे सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर रविवारी भरणारा जनावरांसह शेळ्या-मेंढ्याचा बाजार ८ ते ९ महिने बंद होता. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसह जनावरांच्या बाजारावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचेच आर्थिक नियोजन कोलमडले होते. बाजार कधी चालू होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेला जनावरांचा बाजार आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्यामुळे रविवारी (ता. २७) जनावरांच्या बाजारात गायी, बैल, म्हैस अशी लहान-मोठी १,३२० जनावरे तर ६५२ शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली होती. गेल्या रविवारी बाजार सुरू झाल्यामुळे कालच्या बाजारात व्यापारी, शेतकऱ्यांची वर्दळ होती.
अशी झाली खरेदी-विक्री
या बाजारात ७८ गायींची ३५ ते ८५ हजार, १०३ बैलांची १९ ते ६७ हजार, १३५ म्हैशींची २२ ते ७५ हजार रुपयांपर्यंत अशा ३५७ जनावरांची खरेदी-विक्री झाली. तर ३०५ शेळ्यांची ५ हजारापासून ११ हजार, ९४ मेंढ्यांची ६ ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत अशी ३९९ शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री झाल्याने एकूण ७५६ लहान-मोठी जनावरे, शेळ्या-मेंढ्याच्या खरेदी-विक्रीतून सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.