करमाळ्यातील वास येणारे ८० लिटर दूध नष्ट; ६ डेअरींची तपासणी..
By रूपेश हेळवे | Published: September 9, 2023 04:38 PM2023-09-09T16:38:28+5:302023-09-09T16:38:33+5:30
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील हेरिटेज फूड्स, गुंजेगाव येथील विजया महिला दूध संस्था, मंगळवेढ्यातील मायाक्का मिल्क व श्रीराम डेअरीची तपासणी केली
सोलापूर : दूध भेसळ तपासणी पथक थेट करमाळा तालुक्यात पोहोचले असून, देवळाली येथील विश्वजित मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचे वास येणारे ८० लिटर दूध नष्ट केले. याशिवाय विविध संस्थांच्या दुधाचे नमुने घेण्यात आले.
करमाळा तालुक्यातील देवळाली येथील विश्वजित व हडसन, माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथील रविकिरण, करमाळा तालुक्यातील पांगरे येथील लोकविकास व खडकेवाडीच्या अमोल दूध संस्थेची तपासणी पथकाने केली. विश्वजित मिल्कमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत दूध नकारार्थी आढळल्याने नमुने तपासणीला पाठविण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील हेरिटेज फूड्स, गुंजेगाव येथील विजया महिला दूध संस्था, मंगळवेढ्यातील मायाक्का मिल्क व श्रीराम डेअरीची तपासणी केली. मायाक्का डेअरीतील ८० लिटर दूध वास येत असल्याने नष्ट करण्यात आले. मायाक्का व इतर डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील न्यू महानंदा डेअरीचे दूध नकारार्थी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी नमुने घेतले.
माळशिरसच्या ६ डेअरींची तपासणी..
पथकाने माळशिरस तालुक्यातील सहा दूध संस्थेची तपासणी केली. नकारात्मक दुधाचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले.