पंढरपूर : ‘‘उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला ! वैष्णवांचा मेळा गरुडापरी दाटला!’’ पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी गेले काही दिवस पायी वाटचाल करणाºया विविध संतसज्जनांच्या पालख्यांसह भक्तीगंगा चंद्रभागातीरी दाखल झाल्या असून पंढरपुरात पाऊल ठेवल्याने त्यांना अवघा आनंद झाल्याचे चित्र गुरूवारी पहायला मिळाले. संतांच्या पालख्या मठात तर दिंड्या चंद्रभागातीरी ६५ एकरामध्ये विसावल्या. सुमारे १० लाखाची मांदियाळी पंढरपुरात दाखल झाली आहे.
वाखरी पालखी तळावरून सर्व पालखी सोहळे दुपारनंतर पंढरीच्या दिशने निघाले. कॉलेज चौक, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, भादुले चौकमार्गे प्रदक्षिणा मार्गावरून आपापल्या मठाच्या या पालख्या गेल्या. प्रदक्षिणा मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक् ताबाई यांचे मठ आहेत़ या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या दिंड्यातील वारकºयांची सोय प्रशासनाने नदीपलीकडील ६५ एकर परिसरात केली आहे़ पंढरपुरात प्रमुख महाराजांच्या नावाने सुमारे ३०० पेक्षा जास्त मठांची संख्या आहे़ त्या मठात उर्वरित वारकरी मुक्कामी असतात़ एकटे दुकटे आलेल्या वारकºयांनी चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहणे पसंत केले.
दर्शनासाठी २७ तास...श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून बाहेर आलेल्या रंजना घाणे (साकोरमांडवा, ता़ संगमनेर, जि़ नगर) म्हणाल्या, बुधवारी दुपारी १़३० वाजता दर्शन रांगेत उभी राहिले.गुरुवारी दुपारी ४़३० वाजता दर्शन घेऊन बाहेर आले़ दर्शनासाठी तब्बल २७ तास लागले़ नांदेडचे सुभाष शिंदे, किसन कदम, बालाजी घोगरे म्हणाले, आम्ही गुरुवारी पहाटे ५़३० वाजता गोपाळपूर येथे दर्शन रांगेत उभारलो़ दुपारी ४़४५ वाजता पांडुरंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो़ दर्शन रांगेत शाबूची खिचडी, चहा व पिण्याचे स्वच्छ पाणीही मिळाले़