अबब... कपिला गायीच्या दुधाचे तूप चक्क ७ हजार रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:25 AM2019-04-22T10:25:11+5:302019-04-22T10:27:31+5:30
कपिला गायीचे दूध आणि दुधापासून बनविलेले तूप, गोमूत्र, शेण हे खूपच औषधी गुणधर्माचे आहेत. अनेक रोग समूळ नष्ट करते़ त्यामुळे या गायीचे तूप तब्बल ७ हजार रुपये किलोने विकले जाते.
प्रभू पुजारी
पंढरपूर : दिसायला देखणी... उंचीने कमीच... रंगाने सर्वांग काळी... अशी ही कपिला गाय़ पण या गायीचे तूप चक्क ७ हजार रुपये किलो असून, त्यात औषधी गुणधर्म असल्याने डॉक्टरांकडूनच सर्वाधिक मागणी असते, असे पशुपालक तुकाराम शिवाजी शेंबडे (रा़ इसबावी) यांनी सांगितले.
पंढरपुरातील प्रमुख कार्तिक, माघी आणि चैत्री वारीला वाखरी येथे जनावरांचा बाजार भरतो़ यंदा दुष्काळी परिस्थिती, बाजारातील मंदी किंवा निवडणुकांचा माहोल या कारणामुळे जनावरांच्या बाजारात शुकशुकाट दिसून आला़ कोणता तरी आठवडी बाजार भरल्यासारखी स्थिती चैत्री वारीच्या जनावरांच्या बाजारात दिसून आली़ मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ २५० जनावरांची नोंदणी झाली होती़ काही जनावरे येत होती, यावरून ३०० पर्यंत आकडा जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली़ यंदा प्रथमच इतक्या कमी संख्येने जनावरे आल्याचे बाजार समितीच्या कर्मचाºयांनी सांगितले़ यावेळी जनावरांसाठी बाजार समितीने वाखरी तळावर पाणी, वीज यांसह मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या होत्या.
तीन लाखांच्या गायीला सव्वा लाखाची मागणी
या बाजारात वैशिष्ट्यपूर्ण गायी पाहावयास मिळाल्या़ तुकाराम शेंबडे यांच्याकडे सहा कपिला जातीची गायी असून, त्यांनी बाजारात दोन गायी आणि दोन वासरे विक्रीसाठी आणली होती. त्यातील एक गाय दोन वेळा व्याली असून, सध्या ती गाभण आहे़ तिची किंमत ते तीन लाख रुपये सांगतात, पण ग्राहकांनी सव्वा लाख रुपयांपर्यंत मागणी केल्याचे त्यांनी सांगितले़ या गायीची खरेदी शेतकºयांपेक्षा हौसी व्यक्तीच करू शकते़ कारण ती घरासमोर आकर्षक दिसते़
तुपाला सर्वाधिक मागणी
कपिला गायीचे दूध आणि दुधापासून बनविलेले तूप, गोमूत्र, शेण हे खूपच औषधी गुणधर्माचे आहेत. अनेक रोग समूळ नष्ट करते़ त्यामुळे या गायीचे तूप तब्बल ७ हजार रुपये किलोने विकले जाते़ डॉक्टरांकडूनच या तुपाला सर्वाधिक मागणी आहे़ ही गाय एकावेळी चार लिटर आणि दिवसातून आठ लिटर दूध देते.