दयानंद कुंभार
रानमसले : बातमीचा मथळा वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार.. पण हे खरे आहे... उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरजमध्ये उत्तर सोलापूरपाणीपुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ७ लाखांच्या योजनेतून नवीन विहीर, पंपगृह तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या विहिरीची गावालगत कोरड्या पाझर तलाव परिसरात खोदाई चालू आहे. चाळीस फूट खोलीदरम्यान एक इंचाचे दोन व दोन इंचाचा असे तीन झरे वाहत आहेत.
सध्या चाळीस फुटापर्यंत खोदाई गेली आहे़ सध्या या चाळीस फुटावर मोठ्या दाबाने चार इंच साईजचा झरा भरभरून वाहत आहे. सध्या विहिरीत २५ फुटापर्यंत पाणी असून, सध्या साडेसात एच.पी. व पाच एच.पी. विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा चाचणी घेतली आहे. तरीही पाणी पातळी ‘जैसे थे’ पाहावयास मिळत आहे. सध्या या नवीन विहिरीपासून गाव विहिरीपर्यंत पाइपलाइन नसल्याने पाणी उपसा बंद ठेवला आहे.
पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी...- सध्या ऐन दुष्काळी परिस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी टंचाई जाणवत आहे, तर दुसरीकडे हिरजमध्ये पाण्याचा झरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे़ हे पाणी पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून लोक गर्दी करत आहेत. गेल्या दोन वर्षांत पाणी फउंडेशन अंतर्गत हिरजच्या गावकºयांनी सहभाग घेऊन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. यामुळेच पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ७ लाखांच्या योजनेतून नवीन विहीर घेण्यात आली़ या विहिरीस पाणी मुबलक लागले आहे, मात्र पाइनलाइनअभावी याचा ग्रामस्थांना फायदा होत नाही. यासाठी पाइपलाइन तातडीने होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच लोकांसाठी पाणी वापर होईल़- नंदकुमार पाटील, ग्रामसेवक, हिरज