सख्या पोलीस भावाला ड्युटीवर सोडवण्यासाठी चाललेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:21 PM2020-11-11T12:21:58+5:302020-11-11T12:22:08+5:30
ऊस वाहतुक ट्रॅक्टरच्या ट्राॅली खाली सापडून झाला मृत्यू; नंबरप्लेट नसलेला ट्रॅक्टर झाला पसार
कुर्डूवाडी - कुर्डूवाडी- टेंभुर्णी रस्त्यावर कुर्डू गावानजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन सोलापूर येथील एका दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.अपघातात धनराज सुभाषराव भुजंगा (वय- ३४ रा. साखुळ, ता शिराळा, जि.लातुर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या सख्या पोलीस भावाला ड्युटीवर सोडविण्यासाठी गावाकडून दुचाकीवर ( एम.एच- ४२,ए ई,-२२३८) दौंडकडे तो चालला होता. यावेळी सखा पोलीस भाऊ गणेश सुभाष भुजंगा (रा.साखुळ, ता शिराळा, जि.लातुर) हा देखील गाडीवर पाठीमागे बसलेला होता. तोही या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ऊसाची भरलेली ट्राॅली घेऊन ट्रॅक्टर टेंभुर्णीच्या दिशेने जात असताना ट्रॅक्टरच्या ट्राॅली खाली सापडून दुचाकीस्वार धनराज भुजंगा हा गंभीर जखमी झाला.यावेळी त्याला तातडीने बालाजी कोळेकर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले परंतू धनराज भुजंगा हा गंभीर जखमी असल्याने त्याला ताबडतोब पुढील उपचारासाठी सोलापुर येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले होते.दाखल केल्यानंतर थोड्यावेळाने तेथील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.व पोलीस भाऊ बेशुद्ध पडला होता. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर ट्रॉलीसह लगेच त्या जागेवरून ट्रॅक्टर पळविला. याबाबत पोलिसांत उशिरापर्यंत कोणाही फिर्याद दिली नसल्याने कोणाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.