शीतलकुमार कांबळे
सोलापूर : उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान समजले जाते. या पाण्यामुळे शहर तसेच इतर भागातील नागरिकांची तहान भागविली जाते. ही तहान भागविली जात असताना पाणी जितके प्रदूषणमुक्त असायला हवे तितके होत नाही.
पाणी प्रदूषित करणारे घटक जावे यासाठी ११ ते १२ टप्प्यामध्ये शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने हा नियम सांगितला आहे. आपल्याकडे सात टप्प्यामध्ये शुद्धीकरण होते. त्यामुळे पाण्यातील प्रदूषित घटक काही प्रमाणात तसेच राहतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील पळसदेव, अगोली आदी गावांत मात्र अशी परिस्थिती नाही. या गावामध्ये उत्कृष्ट दर्जाचे जलशुद्धीकरण प्रकल्प उभे करण्यात आले आहे. या पद्धतीचे जल शुध्दीकरण प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील उभे करणे गरजेचे आहे.कुरकुंभ एमआयडीसी येथून मोठ्या प्रमाणात रसायने उजनी धरणातील पाण्यात मिसळतात. याचा परिणाम या पाण्यावर होतो. उजनी धरण परिसरातील गावातील जनावरे थेट पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाले आहेत. तसेच या पाण्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे.
जलाशयातील वनस्पती तसेच इतर जलचरांवरही परिणाम होत आहे. मच्छीमारीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पायाला खाज सुटत आहे. या प्रकारच्या ़अनेक तक्रारी मच्छीमारांनी केल्या.
पाण्याची शुद्धता मापण्यासाठी टीडीएसचा स्तर
- - शहरात होणाºया पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये किडनी स्टोनसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. तसेच पोटाचे विकारही वाढतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी त्यांच्या आरोग्यावर अधिक दूरगामी परिणाम होऊ शकतो.
- - पिण्याच्या पाण्याची शुद्धता मापून पाहण्याकरिता टीडीएस (टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स ), पीएच स्तर आणि पाण्याचा खारेपणा पाहिला जातो.
पाण्यामध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रासायनिक घटक मिसळू नयेत याची प्रथम काळजी घ्यायला हवी. प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर गावागावांमध्ये शुद्धीकरण प्रकल्प उभे करावे. याद्वारेच डब्लूएचओच्या मापदंडानुसार आपण पाणीपुरवठा करु शकतो.- डॉ. जी. एस. कांबळे, संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूऱ
उजनी धरणातील पाण्याचा टीडीएस ८५० ते ९०० आहे. कोयना धरणाचा टीडीएस १५० ते २०० दरम्यान आहे. पुणे, दौंड, पिंपरी येथील प्रदूषित पाणी उजनी धरणात येत असल्याने या पाण्याची अशी अवस्था आहे. त्या ठिकाणावरील पाण्यावर प्रक्रिया करुन पुढे सोडणे हा चांगला उपाय आहे.- विलास लोकरे, अध्यक्ष, सीना-भीमा संघर्ष समिती