वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !
By admin | Published: March 18, 2017 06:09 PM2017-03-18T18:09:38+5:302017-03-18T18:09:38+5:30
वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !
वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !
प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचे आवाहन
सोलापूर : ग्राहकांना अचूक व वेळेवर वीजबिले देण्यासह थकबाकी वसुलीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. थकबाकी वसुली ही महावितरणची आर्थिक गरज आहे. त्यामुळे वसुलीमध्ये हयगय झाल्यास संबंधितांविरुद्घ कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला.
येथील बिजली भवनमध्ये आयोजित सोलापूर मंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर उपस्थित होते. प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी स्वत: पुढाकार घेऊन अधिकारी काम करत आहेत. मात्र काही ठिकाणी वारंवार सूचना देऊनही जे अधिकारी काम करीत नाहीत, त्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वीजबिलांच्या थकबाकीची शंभर टक्के वसुली, ग्राहकांना अचूक बिल, वीजगळती कमी करणे व सुरळीत वीजपुरवठा करणे हे आपले मूलभूत उद्दिष्ट आहे. ते सर्वांनी पूर्ण करायचे आहे. साडेसात अश्वशक्ती व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषिपंपांना वीजमीटर अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्व कृषीपंपांना या महिन्याअखेर वीजमीटर बसविण्यात यावेत. ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याच्या कामास गती देऊन मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही ताकसांडे यांनी दिले. यावेळी सोलापूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अरुण थोरात, कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सुनील यादव, संदीप सानप, सुरेश कोळी, अमसिद्घ हुवाळे, मधुसूदन बरकडे, प्रणाली विश्लेषक मकरंद बोराळकर यांच्यासह सोलापूर मंडलातील अभियंते, अधिकारी उपस्थित होते.