स्वअध्ययनाची जोड; देगाव येथील झेडपी शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:37 PM2020-08-24T14:37:09+5:302020-08-24T14:39:51+5:30
मुलांचा प्रतिसाद : जे आॅनलाईन शिकविले, त्याची भिंतवाचनाने होते उजळणी
सोलापूर : शेतमजुरी आणि दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाºया देगाव येथील जिल्हा परिषद (मुले) शाळेच्या भिंती आता शैक्षणिक उपक्रमांनी बोलक्या झाल्या आहेत़ सकाळी मोबाईलवर आॅनलाईन धडे गिरवून दुपारी काही मुले शाळेच्या आवारात भिंतीवरील उपक्रमांचा आधार घेत स्वअध्ययनाची जोड दिली आहे.
देगाव येथे शेतकरी आणि कष्टकरी मुलांसाठी १८९२ साली शाळा सुरू झाली़ आज या शाळेला १२८ वर्षे पूर्ण झाली. मुख्याध्यापिका शाबेरा काझी यांनी मुलांच्या अभ्यासक्रमाने भिंती रंगवण्यासाठी काही प्रमाणात शासनाचा निधी मिळवला; मात्र तो कमी पडला़ त्यांनी अर्धे पैसे स्वत:कडचे खर्ची करून अध्ययनात्मक उपक्रमाने भिंती रंगवल्या. ज्ञानरचनात्मक क्लुप्त्यांवर भर दिला आहे.
भिंतीवरील ही माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर घालणारी ठरली. इतकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा तयारी करणाºया काही विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही या भिंतींनी भर घातला. सर्वसामान्य व्यक्ती येथून जात असेल तर तो दोन मिनिटे थांबून शाळेच्या भिंती न्याहाळतो. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शिक्षक मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज अभ्यासक्रमाची आखणी करतात. सकाळी हे शिक्षक मोबाईलवर आॅनलाईन विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासक्रम समजावून सांगतात़ सध्या वर्ग बंद असले तरी काही विद्यार्थी सकाळी आॅनलाईन धडे गिरवून दुपारी या भिंती समोर थांबून उजळणी करतात़
असा आहे रंगविलेला अभ्यास !
- - या भिंतीवर वर्षातले तीन ऋतू, सनावळ्या, विविध देशांची माहिती, पर्यावरण, विज्ञान प्रयोग आणि संगणक घटकाची माहिती रेखाटली आहे.
- - समाजातील बारा बलुतेदारी आणि त्यांच्या व्यवसायावर आधारित माहिती साकारली आहे.
- - रेल्वे, पोस्ट, सरकारी दवाखाने आणि इतर शासकीय कार्यालयांवर आधारित माहिती रंगवली आहे़
- - या ई-लर्निंग शाळेत बोलक्या भिंतीची भर पडल्याने विद्यार्थ्यांना अध्ययन कृती सोपी झाली आहे.
३५ वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांची चांगली फळी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेवानिवृत्तीच्या टप्प्यात शाळेची सुधारणा व्हावी हीच इच्छा होती. विद्यार्थी आणि शाळा याचे आपण काहीतरी देणे लागतो. या शाळेच्या भिंती रंगवताना पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठराव्यात म्हणून वेगळा प्रयत्न केला.
- शाबेरा काझी
मुख्याध्यापिका, देगाव (मुले) झेडपी शाळा