सोलापूर : अधिकमास महिन्याच्या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात पंढरपुरात गर्दी झाली होती. अधिकमास महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मंदिर समितीस ७ कोटी १९ लाख रुपयांचे दान केले आहे. यामुळे अधिकमास महिन्यात मालामाल झाली आहे. १८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ कालावधीत अधिकमास संपन्न झाला.
या कालावधीत आलेल्या भाविकांना मंदिर समितीकडून पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या कालावधीत ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे ५ लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला आहे. विठ्ठलाच्या चरणाजवळ, नित्यपुजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र, देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा, मोबाईल लॉकर इत्यादी माध्यमांतून सदरचे उत्प्नन मिळालेले आहे. या अधिकमासात मंदिर समितीस विविध माध्यमांतून ७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळालेले आहे. सन २०१८ मध्ये २ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. सन २०१८ च्या तुलनेने यावर्षीच्या अधिकमासाच्या उत्पन्नात ४ कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
अधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथाअधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून, २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किंमतीचे सोने व ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व प्राप्त देणगीतून भाविकांना अत्याधुनिक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.