आई-वडिलांच्या निधनानंतर दोन बहिणींचा संसार उभारून भावाने घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:51 AM2019-05-30T11:51:07+5:302019-05-30T11:57:16+5:30
काळ रात्र; मित्रांचा ‘बापू’ गेल्याने शिंदे चौकावर शोककळा
सोलापूर : वीस वर्षांपूर्वी आजाराने आई-वडिलांचा मृत्यू झाला, लहान वयातच घरात असलेल्या दोन बहिणींची जबाबदारी स्वीकारून त्यांचा संसार उभा करणाºया भावाने जगाचा निरोप घेतला. मंगळवारी पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दुर्दैवी अपघात गणेश निकम यांच्यासाठी काळरात्र ठरली. मित्रांचा लाडका ‘बापू’ गेल्याने शिंदे चौकावर शोककळा पसरली.
गणेश सतीश निकम (वय ३५) हे शिंदे चौक येथील मूळचे रहिवासी होते. चौकात त्यांचे शिवराज आॅटो कन्सल्टिंगचे दुकान असून ते जुन्या मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. वयाच्या १६ व्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरपले होते, घरात दोन बहिणी, एक भाऊ व स्वत: असा चौघांचा परिवार होता. शीतल आणि निर्मला या दोन लहान बहिणींची मोठी जबाबदारी गणेश निकम यांच्यावर आली होती. वडिलांच्या सायकल दुकानच्या जागेत मोटरसायकलींचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बहिणींचे जेमतेम शिक्षण पूर्ण केले, त्यांच्यासाठी स्वत:चे शिक्षण १0 वी नंतर थांबवून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.
कमी वयात स्वीकारलेली जबाबदारी आणि घरची परिस्थिती हलाखीची असताना गणेश मोठ्या जिद्दीने काम करीत होते. ८ वर्षापूर्वी चार नंबरचा भाऊ निखिल याचाही आजाराने मृत्यू झाला. आई-वडिलानंतर भावाची साथ मिळेल असे वाटत असताना त्याचाही मृत्यू झाल्यानंतर गणेश निकम हे एकटे पडले. कालांतराने चुलत्याच्या व चुलत भावाच्या मदतीने ते आपला व्यवसाय सांभाळत होते. घरात फक्त दोन बहिणी होत्या; मात्र कालांतराने एका पाठोपाठ एक अशा दोन्ही बहिणींची लग्ने गणेश यांनी लावून दिली. दोन्ही बहिणी आपल्या सासरी निघून गेल्या, गणेश हे घरात एकटेच होते. वारद चाळीतील मावशी गणेश यांना दररोजचा डबा करून देत होती. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे मावशीकडून आलेल्या डब्यात जेवण केले. सायंकाळी केगाव येथे एका मित्राच्या घरी कार्यक्रम होता. गणेश निकम व मित्र विजय पावले हे दोघे मोटरसायकलवरून केगाव येथे गेले. रात्री उशीर होत असल्याने ते तेथे न जेवता डबा घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाले. स्टर्लिंग मोटार्स व मधुबन हॉटेलच्या समोर आले असता, समोरून येणाºया कारने जोरात धडक दिली त्यात गणेश निकम यांचा मृत्यू झाला.
बहिणींनी फोडला हंबरडा...
- आई-वडील आणि भाऊ या तिन्हींची भूमिका बजावणारे गणेश निकम यांचा अपघात झाल्याची माहिती दोन्ही बहिणींना देण्यात आली. दोघी सोलापुरात आल्या, रुग्णालयात गणेश निकम यांचा मृतदेह पाहताच दोघींनी हंबरडा फोडत रडण्यास सुरुवात केली. ‘बापू’ आता आम्हाला कोण? असा टाहो फोडला. हा प्रसंग पाहून उपस्थितांचे हृदय मात्र पिळवटून गेले.
- नातेवाईकांनी वयाच्या २२ व्या वर्षांपासूनच गणेश यांना लग्नाचा आग्रह धरला होता. दोन बहिणींचे लग्न झाल्यावर पुन्हा आग्रह धरल्यानंतर त्यांनी काहीतरी करून दाखवल्याशिवाय करणार नसल्याचे सांगितले होते. आता कुठेतरी चांगले दिवस आले होते, यंदा लग्न करायचं अशी चर्चा सुरू होती. काळाने घात केला दोन बहिणींचा संसार उभारून स्वत:च्या संसाराची तयारी करीत असताना गणेश निकम यांनी जगाचा निरोप घेतला.