सोलापूर : शहरातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे. रिक्षा चालकांना प्रथमत: गणवेश घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर गणवेशाची सक्ती असणार आहे.
रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरातील रिक्षा संघटना व रिक्षा चालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सर्व रिक्षा चालकांना गणवेश परिधान करणे, रिक्षामध्ये रिक्षा चालक, मालक यांचे नाव व मोबाईल नंबर यांचे बोर्ड लावण्याबाबत सूचना केल्या. नियमांचे पालन करण्याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनिल लंभाते, वाहतूक शाखा दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, शहर वाहतूक शाखा उत्तर विभागाचे प्रभारी अधिकारी जीवन निरगुडे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, पँथर पॉवर रिक्षा युनियनचे अध्यक्ष बागवान, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष अजिज खान, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मुल्ला, एस.टी. स्टॅन्ड रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळे आदी रिक्षा चालक उपस्थित होते.
दिवाळीपर्यंत जनजागृती : डॉ. दीपाली धाटे
० शहरातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी सध्या लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत. याचा अर्थ सध्या कारवाई केली जात नाही असे नाही. कारवाई तर सुरूच आहे; मात्र दिवाळीनंतर नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. दुचाकी, तीनचाकी रिक्षा, चारचाकी कार आणि जड वाहनांना नियम पाळावे लागणार आहे. नियम न पाळल्यास संबंधितांवर वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. प्रसंगी गुन्हेही दाखल केले जातील अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.