महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर भाजपचा राज्यात कुठेही विजय झाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:58+5:302021-03-31T04:22:58+5:30

यावेळी जयंत पाटील यांनी राज्यात अस्तित्वात असलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी एकसंध आहे. आघाडीतील सर्व पक्षांशी चर्चा करूनच भगीरथ भालके ...

After the formation of Mahavikas Aghadi, BJP has not won anywhere in the state | महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर भाजपचा राज्यात कुठेही विजय झाला नाही

महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर भाजपचा राज्यात कुठेही विजय झाला नाही

Next

यावेळी जयंत पाटील यांनी राज्यात अस्तित्वात असलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी एकसंध आहे. आघाडीतील सर्व पक्षांशी चर्चा करूनच भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. आ. भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्व. भालके यांचे विचार व अपूर्ण कामे पुढे न्यावीत, यासाठी खा. शरद पवार यांनी भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी एकसंध असल्याचा अनुभव यापूर्वी पदवीधर निवडणूक, सांगली, जळगाव नगराध्यक्ष व इतर निवडणुकांमध्ये आलाच आहे. त्यामुळे या निवडणुकीत वेगळा अनुभव न येता महाविकास आघाडीचा मोठा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले संजय शिंदे, उत्तम जानकर, दीपक साळुंखे हेच माझे खरे निरीक्षक म्हणत या तिघांवर मोठी जबाबदारी असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

दिवंगत आ. भारत भालके हे सलग तीन टर्म आमदार झाले. आता शेवटच्या टर्मला विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अनेक आमदार आम्हाला भेटून मताधिक्य सांगत होते. मात्र स्व. भारत भालके हे एकमेव आमदार असे होते की माझा साखर कारखाना अडचणीत आहे. त्याला मदत करा. ३५ गावच्या पाण्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता द्या, अशी सर्वसामान्य जनतेची विविध कामे घेऊन ते तासन‌्तास खा. शरद पवार, अजित पवार व माझ्याकडे सतत येऊन बसायचे. भारत नानांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ३५ गावातील ११ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी दिले. राहिलेल्या २४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी २ टीएमसी पाणी राखून ठेवले आहे. आचारसंहिता संपताच त्याचा नव्याने अध्यादेश काढण्यात येणार असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण नानांच्या निधनानंतर अनेकवेळा या मतदारसंघात कानोसा घेतला होता. भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सर्वांची मागणी होती. भारत भालके हे जनतेची कळकळ असलेला नेता होता. त्यांचे सर्व गुण भगीरथ भालके यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांची अपूर्ण कामे, जनतेची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके हे सक्षम उमेदवार आहेत. जनतेने त्यांच्यामागे सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी २००९ साली राज्यस्तरावरील नेता कै. भारत भालकेंपुढे टिकला नाही, असे म्हणत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर टिका केली. तर हा आवताडे कसा टिकेल, अशी मिश्किल टिका केली.

फडणवीस शब्द पाळणारा नेता

जयंत पाटील भाषणास उठल्यानंतर संदीप मांडवे यांनी स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर फडणवीस सांत्वन करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी भगीरथ भालकेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू, पोटनिवडणुकीत उमेदवारी देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यावर जयंत पाटील यांनी मिश्किल टिका करत देवेंद्र फडणवीस हे शब्द पाळणारे नेतृत्व आहे. भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी अर्ज माघारी घेण्यासाठी ३ तारखेपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे ते आपल्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यास भाग पाडतील व भगीरथ भालकेंना बिनविरोध करण्यासाठी हातभार लावतील, अशी टिका करताच कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली.

लोकसभेच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे

संजय शिंदे व आ. प्रशांत परिचारक यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे संजय शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र संजय शिंदे यांनी भाषण करताना मी मागे एक पुढे एक बोलत नाही. भारतनाना आणि माझी घट्ट मैत्री होती. असे सागंत २००९ च्या निवडणुकीत मोहिते-पाटील इथं लढले नसते तर माढ्यात आले असते आणि त्यावेळी मी स्व. नानांना शब्द दिला होता. तुमच्या हातून सुटले तर आम्ही नक्कीच पाडू, असे जुनी आठवण भारत भालकेंची सांगितली. त्यावेळी मोहिते-पाटलांची एवढी दहशत होती की त्यांना पाडण्याच्या बैठका आम्ही सोलापूरच्या तालमीत घेतल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. त्यानंतर लोकसभेत मला हरविण्यासाठी कोणी कोणी काम केले हे मला माहित आहे. तेच लोक आज आवताडेंना निवडून आणण्यासाठी पुढे पुढे करीत आहेत. मात्र मी आता लोकसभा पराभवाचा बदला घेण्याची संधी आली आहे, ती मी सोडणार नसल्याचे संजय शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समेट

भगीरथ भालके यांचा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील, दत्तात्रय भरणे यांनी पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी प्रथम भगीरथ भालके यांना सोबत घेऊन विठ्ठल हॉस्पिटलला नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संजय शिंदे, बळीराम साठे, सुरेश घुले यांनी पुन्हा नाराजांची समजूत काढत निष्ठावंतांना भविष्यात नक्की न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नाराज पदाधिकारी व भगीरथ भालके यांच्यात समेट घडविल्याचे जाहीर केले. नाराजांनीही भगीरथ भालके यांचा प्रचार करत निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. नंतर हा सर्व नाराज गट व्यासपीठावरही एकत्र दिसला.

फोटो लाईन ::::::::::::::::::::::::

श्रीसंत तनपुरे महाराज मठात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जलसंपदामंत्री जयंत पाटील. व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, प्रणिती शिंदे, संजय शिंदे, संभाजी शिंदे, महिबूब शेख,उमेदवार भगीरथ भालके आदी.

Web Title: After the formation of Mahavikas Aghadi, BJP has not won anywhere in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.