पुण्यानंतर लातूर, सांगली, पिंपळगाव बाजार समित्या उलाढालीत अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 11:35 AM2021-02-06T11:35:30+5:302021-02-06T11:37:24+5:30
सोलापूर सातव्या क्रमांकावर : गतवर्षात १३६६ कोटी रुपयांचा टर्नओव्हर
सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढालात राज्यात सर्वाधिक असून लातूर दुसऱ्या, सांगली तिसऱ्या तर पिंपळगाव पिंपळगाव बसवंत ( नाशिक) चौथ्या क्रमांकावर आहे. सोलापूरबाजार समिती सातव्या क्रमांकावर गेली आहे.
बाजार समितीत दररोज होणाऱ्या खरेदी-विक्रीवर उलाढाल अवलंबून असते. त्यातही लोकसंख्येत मोठ्या शहरात बाजार समितीची उलाढाल मोठी होते. मात्र विश्वासार्हता निर्माण झालेल्या बाजार समित्या लहान असल्या तरी मोठी उलाढाल होतेच. पुणे शहराची लोकसंख्या मोठी असल्याने बाजार समितीची उलाढालही सर्वाधिक असणे साहजिकच आहे. पुणे शहरातील बाजार समितीची २०१९-२० ची उलाढाल चार हजार २३१ कोटी इतकी झाली होती. त्यानंतर लोकसंख्येत मोठे शहर नसलेल्या लातूरची वार्षिक उलाढाल १९१४ कोटी, सांगली बाजार समितीची उलाढाल १८८० कोटी, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीची उलाढाल १५८० कोटी, लासलगाव बाजार समितीची १४१२ कोटी, तर सातव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर बाजार समितीची उलाढाल १३६६ कोटी इतकी झाली होती.
हिंगणघाट बाजार समिती ११०६ कोटी, अमरावती बाजार समिती ९७३ कोटी, खामगाव बाजार समिती ९६८ कोटी, अहमदनगर बाजार समिती ९२५ कोटी, नाशिक ९२४ कोटी रुपये इतकी उलाढाल झाली आहे. बेदाणा विक्रीसाठी नावाजलेल्या तासगाव बाजार समितीत ८६१ कोटी, उदगीर ८२९ कोटी, कोल्हापूर ७६८ कोटी, जुन्नर ७५४ कोटी, मालेगाव ६३८ कोटी, जालना ६१४ कोटी, मलकापूर ५८७ कोटी, तर धामणगाव रेल्वे ५६८ उलाढाल करून २० व्या क्रमांकावर आहे.
राज्यातील ३०६ समित्या ‘अ’ दर्जाच्या
- - राज्यातील ३०६ बाजार समित्यामध्ये ‘अ’ दर्जाच्या आहेत. १५९, ‘ब’ दर्जाच्या, ६६ क दर्जाच्या, तर ३५ ‘ड’ दर्जाच्या ४६ बाजार समित्यांचा समावेश आहे.
- - राज्यातील बाजार समित्याकडून ५६ कोटी ४४ लाख रुपये अंशदानाची रक्कम पणन मंडळाकडे जमा होणे अपेक्षित आहे; पण जानेवारीअखेर २० कोटी २२ लाख रुपये वसूल झाला, तर ३६ कोटी २२ लाख थकबाकी आहे.
- - सोलापूर बाजार समिती उलाढालीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे बाजार समितीत सातत्याने सांगितले जाते मात्र २०१९-२० मध्ये सोलापूर सातव्या क्रमांकावर गेली आहे.