दोन तास रिक्षात फिरूनही बेड मिळाला नाही, शेवटी महिलेला रिक्षातच हार्ट अटॅक आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:52 PM2021-04-20T13:52:18+5:302021-04-20T13:54:14+5:30
चिडगुपकर येथील प्रकार : नातेवाइकांनी रिक्षा घरी नेली आणि शेवटी रात्री अंत्यविधी केला
सोलापूर : छातीमध्ये चमकू लागल्याने महिलेला उपचारासाठी नातेवाईकांनी रिक्षातून दवाखान्याला नेले मात्र तेथे बेड नसल्याने निराशा झाली. एक म्हणता म्हणता आठ ते नऊ दवाखान्यांमध्ये नेले मात्र कोठेही ऍडमिट करून घेण्यात आले नाही. शेवटी सम्राट चौक येथील चिडगुपकर हॉस्पिटलच्या दारातच महिलेला हार्ट अटॅक आला आणि तिने जगाचा निरोप घेतला.
छाया विठ्ठल लोंढे (वय ६५ रा. जय मल्हार चौक) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता छाया लोंढे यांना अचानक छातीमध्ये चमकू लागले होते. चमक कमी होईल म्हणून थोडावेळ घरगुती उपाय करण्यात आला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जास्त त्रास होऊ लागला त्यामुळे नातेवाईकांनी छाया लोंढे यांना उपचारासाठी प्रथमता एका मोठ्या हॉस्पिटलला नेले. तेथे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. तेथून त्यांना शहरातील सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना 'बेड शिल्लक नाही' एवढंच सांगितलं जात होतं.
या नाहीतर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतील या आशेपोटी नातेवाईक तब्बल दोन तास शहरातील हॉस्पिटल फिरत होते. शेवटी सम्राट चौक येथील चिडगुपकर हॉस्पिटल येथे एक बेड शिल्लक आहे असे समजले. रिक्षा तिकडे वळवण्यात आली मात्र तेथे गेल्यानंतर दारातच दवाखान्यातील कामगाराने बेड शिल्लक नाही असे सांगितले. हे वाक्य ऐकताच छाया लोंढे यांना रिक्षातच हार्ट अटॅक आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. नातेवाईक हात बंद झाले त्यांनी रिक्षा तशीच घरी फिरवली आणि शेवटी छाया लोंढे यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. छाया लोंढे या आई वडिलांच्या घरात रहात होत्या.
नॉन कोव्हिडं वार्ड उभे करण्यात यावे : सोहन लोंढे
- कोरोनामुळे सध्या सर्वत्र हॉस्पिटलमध्ये बेड नाही असे सांगितले जात आहे. मात्र ज्यांना कोरोना झाला नाही अशा रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. जगणारी माणसं उपचाराअभावी मरण पावत आहेत. कोरोनाच्या नावाखाली नॉन कोव्हीड रुग्णांना ऍडमिट करून घेतलं जात नाही. गरीब व सर्वसामान्यांवर हा अन्याय होत आहे. स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये नॉन कोव्हीड वार्ड करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोहन लोंढे यांनी केली आहे.