वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत पदार्थ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 01:36 PM2021-06-18T13:36:52+5:302021-06-18T13:36:58+5:30
शेंगा, पामतेलाच्या दरात घसरण : पुढील दिवसांत होणार आणखी स्वस्त
सोलापूर : जवळपास एक वर्षात खाद्य तेलाच्या किमती चढ्याच होत्या. आता या किमतीत घसरण होत असून शेंगदाणा, पाम व रोहिणी तेल स्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना चमचमीत पदार्थ खाणे परवडणार आहे.
मागील वर्षी ९० ते १२० रुपयांना मिळणारे एक लिटर तेलाचे पाकीट १६० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ५० ते ७० रुपयांची वाढ झाली होती. मागील वर्षी मे महिन्यात पेट्रोलचा दर ७५ ते ८० रुपये प्रतिलिटर होता. आता हा दर १०० च्या पुढे गेला आहे. डिझेलचे दर वाढल्याने वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळेच किराणा वस्तूंच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. वाढत्या महागाईनुसार महिन्याचे बजेट तयार करताना महिला वर्गाची दमछाक उडत होती. यातून थोडा का होईना दिलासा मिळत असून तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.
आधीच कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेला सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटालाही तोंड देतो आहे. त्यातच नोकरी आणि रोजगार गमावावा लागल्यामुळे अनेकांना दैनंदिन खर्च कसा भागवायचा, याचा प्रश्न पडतो आहे. महाग झालेल्या खाद्यतेलामुळे दर महिन्याचा खर्च आणखीच हाताबाहेर गेला आहे.
गृहिणीसोबतच हॉटेल व्यावसायिकांना दिलासा
तेलामुळे फक्त गृहिणीच नव्हे तर छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना चिंता होती. तेल महाग झाल्यामुळे खाण्यावर मर्यादा आल्या होत्या. तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण घटले होते. आता तेलाच्या दरात घसरण होत असून येत्या काळात आणखी घट झाल्यास पूर्वीसारखेच गृहिणी व हॉटेल व्यावसायिक खाद्य पदार्थ तयार करतील.
खाद्य तेलाचे दर (प्रति किलो)
- आधी आता
- रोहिणी १६५ १५५
- शेंगा १७० १६०
- पाम १४० १३०
- सूर्यफूल १८५ १८५
खाद्यतेल हे सर्वसामान्य माणसाच्या दर महिन्याच्या किराणा खर्चातील महत्त्वाचा घटक असतो. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठा फटका बसतो. यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. रोहिणी, शेंगदाणे आणि पामतेलाच्या किमतीत घट झाली असून सूर्यफूल तेलाचे दर तसेच आहेत. पुढील १० दिवसांत तेलाच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
- आनंद परदेशी, तेल विक्रेते