अक्कलकोट तालुक्यात ५५०० शेतकऱ्यांची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:22 AM2021-03-17T04:22:32+5:302021-03-17T04:22:32+5:30
अक्कलकोट : शेती पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत ...
अक्कलकोट : शेती पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत तब्बल ५ हजार ५२० शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. परिणमी मागील तीन दिवसांपासून अक्कलकोट येथील कार्यालयात थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
मागील अनेक वर्षांपासून शेती पंपाची थकबाकी वसूल झालेली नाही. शेतकऱ्यांनीसुद्धा वीज बिल माफी मिळेल या आशेने अनेकांनी थकबाकी भरलेली नाही. ही थकबाकी सर्वसामान्यांबाबत आता ती लाखाच्या घरात पोहोचली आहे. शेतकऱ्यांना सोयीचे ठरावे म्हणून शासनाने दोन महिन्यांपूर्वी कृषी धोरण २०२० या योजनेखाली पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बिलात सूट देण्याची योजना आणली. त्याकडे शेतकऱ्यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यात राज्य सरकार कधी वीज तोडू नका म्हणून सांगते तर कधी सर्वांना वीज बिल भरावे लागेल म्हणत आहे. या विसंगती मुळे शेतकरी, अधिकारी, कर्मचारी सारेच बुचकळ्यात पडले होते. अचानकपणे १३ मार्चपासून सरसकट डीपी बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला ही पिके वाळू लागली आहेत. यंदा कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नियोजन कोलमडले आहे. थोडाफार असलेला ऊस साखर कारखान्याना पाठवून दिला असून त्याचे अद्याप बिल मिळाले नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी दुष्काळात तेरावा महिना अनुभवत असल्याच्या प्रतिक्रिया नंदकुमार चव्हाण (चुंगी), प्रशांत म्हेत्रे (सलगर), गंगाधर बिराजदार (रामपूर), आंदप्पा कळके (अक्कलकोट) यांनी नोंदवल्या आहेत. ५ एचपी कनेक्शन असताना साडेसात एचपीचे बिल आल्याचे नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.
--
४६० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित
तडवळ, गुद्देवाडी, अंकलगे, कोर्सेगाव, दुधनी, मैंदर्गी, चप्पळगाव, चुंगी, मोटयाळ, कुरनुर, किणी, वागदरी, घोसळगाव, नागणसूर, तोळणूर, जेऊर, शिरवळ या भागातील तब्बल ४६० रोहित्रांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ५२० आहे.
--
कृषिपंपाची थकबाकी वसूल मोहीम तीव्र करण्यात आली आहे. १ ते १५ मार्च २१ या काळात ७६१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख रुपये वीज बिल भरणा केला आहे. ज्यांनी बिल भरले आहे त्यांची जोडणी करून दिली जात आहे. यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे नोटीस देण्यात आली आहे.
- संजीवकुमार म्हेत्रे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
---
१६ अक्कलकोट
विजेची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.