सोलापूर /अक्कलकोट : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मीतीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे.या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती गेल्यानंतर आमच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार आहे.त्यात कहर म्हणजे शासनाकडून एकरी अत्यल्प मोबदला जाहीर केल्याने आमच्यासमोर मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून समृद्धी महामार्ग प्रमाणे गुंठेवारी पद्धतीने आम्हाला भरघोस मोबदला द्या अन्यथा अक्कलकोट तालुक्यातून या प्रकल्पासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
अक्कलकोट येथे बाधित शेतकऱ्यांची आक्रोश सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, भाजपा महिला अध्यक्षा, सुरेखा होळीकट्टी, कालिदास वळसंगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुरत चेन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या अत्यल्प मावेजाच्या नोटिसांची सामुदायिक होळी करण्यात आली. या बैठकीचे आयोजक शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी समृद्धी मार्ग किंवा बाजारभावाच्या पाचपट दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी शासनाच्या नोटिसा घेऊ नये व बलिदानास सज्ज राहावे असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून शासनाच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला. पुढच्या आठवड्यापासून तालुक्यात उग्र आंदोलन छेडणार असल्याचे बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.
या बैठकीस शेखर कुंभार, चेतन जाधव, सुभाष शिंदे, संजय जाधव, अमित काळे, अजय सुरवसे, वीरेश भंगरगी, जगदेवआप्पा कलमनी, मल्लिनाथ मैत्री, संजय सवळी, दीपक कदम, शंभुलिंग अकतनाळ, ज्ञानेश्वर पवार, नागनाथ सुलगडले आदि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.