प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्वांचे उमेदवारी अर्ज मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:49 PM2019-03-27T14:49:14+5:302019-03-27T14:52:23+5:30
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या अर्जाला कोणीच हरकत घेतली नाही.
सोलापूर : सोलापूरलोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व २६ उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केले.
सोलापूर लोकसभा मतदार संघातून २६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी होती. यावेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या उमेदवारी अर्जाला अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या वकीलांनी आक्षेप खोडून काढल्यावर अर्ज मंजूर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या अर्जाला कोणीच हरकत घेतली नाही. त्यामुळे छाननीत अर्ज मंजूर झाल्याचे भारिपचे शहर अध्यक्ष अॅड. बडेखान यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भारिपचे जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे उपस्थित होते. हिंदुस्तान जनता पार्टीचे झळकी येथील व्यंकटेश्वर महास्वामी यांचाही अर्ज मंजूर झाल्याचे त्यांनी स्वत: सांगितले.
सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी दाखल केलेल्यांच्या अर्जाची आज छाननी होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छाननी प्रक्रियेसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी व वकीलांनाच कार्यालयात सोडण्यात येत होते. भाजपातर्फे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या अर्जाचे काय होतेयं हे पाहण्यासाठी अनेकजण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत बरीच चर्चा झाली होती. त्याबाबत काही आक्षेप येतात का याबाबत उत्सुकता होती. पण जिल्हाधिकाºयांनी अर्ज मंजूर केल्याचे समजताच जंगम समाजाचे अध्यक्ष कंदलगावकर, शिवसिद्ध बुळ्ळा यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला़