पॅसेंजरसह सर्व रेेल्वे गाड्या धावणार विजेवर; ९३ वर्षांनंतर सोलापुरात पोहोचले विद्युतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:16 PM2021-02-26T13:16:30+5:302021-02-26T13:16:37+5:30
मार्चनंतर रेेल्वे धूरमुक्त : सोलापूर स्थानकामध्ये उभारले पोल; प्रारंभी मालगाडी जाणार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - देशात १९२३ साली मुंबईत विद्युतीकरण पूर्ण झाले होते. ठाणे ते मुंबई ही पहिली रेल्वे विजेवर धावली होती, त्यानंतर तब्बल ९८ वर्षानंतर रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सोलापुरात पोहोचले आहे. सोलापूर विभागातील विद्युतीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून मार्चनंतर सोलापूर विभागातील सर्वच गाड्या विजेवर धावणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणाच्या कामानंतर २४ डिसेंबर २०१८ रोजी भिगवण ते सोलापूर व सोलापूर ते कलबुर्गी या मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास सुरुवात झाली. भिगवण ते सोलापूर या ३८५ किलोमीटर व सोलापूर ते कलबुर्गी या २६१ किलोमीटर लांबीचे काम मागील काही वर्षापासून वेगात सुरू आहे. कोरोनामुळे देशात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे या कामाची थोडी गती मंदावली होती, मात्र त्यानंतर विविध अडथळे पार करीत विद्युतीकरणाची लाईन टाकण्याचे काम मागील काही दिवसांपासून सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार मार्चनंतर सोलापूर विभागातील सर्वच गाड्या या विजेवर धावणार असल्याचे सांगण्यात आले.
वेळोवेळी कामाचा आढावा
विद्युतीकरणाच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. सोलापूर रेल्वे स्टेशनपासून बाळे स्थानकापर्यंत सध्या पोल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. काही पोलवर मास्टर हेड वायर ओढणे बाकी आहे. पोल उभारणीबरोबरच वायरिंगच्याही कामांचा सर्व्हे होत आहे. विद्युतीकरणाच्या कामांची वेळोवेळी चाचणी, आढावा घेण्यासाठी ‘ओएचई निरीक्षण कॅब व्हॅन’ सातत्याने सोलापूर स्टेशन परिसरात धावत आहे.
सुरक्षा आयुक्त करणार पाहणी
रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर सुरुवातीला रेेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी होईल, एफओबी उंची, पॉवर, आर्थिंग यासह आदी बाबी योग्य त्या तपासण्यात येतील, त्यानंतर या मार्गावर मालवाहतूक गाड्या धावतील, त्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू होईल असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या कामावर एक नजर
- - भिगवन-वाशिंबे - १३ नोव्हेंबर २०२० रोजी कार्यान्वित
- - वाशिंबे-कुर्डूवाडी - १३ नोव्हेंबर २०२० रोजी कार्यान्वित
- - कुर्डूवाडी-साेलापूर - फेब्रुवारी २०२१ मध्ये काम पूर्ण
- - सोलापूर-दाैंड - मार्च २०२१ मध्ये काम पूर्ण
- - दौंड-सावळगी - डिसेंबर २०२० मध्ये काम पूर्ण
- - सावळगी-कलबुर्गी - नोव्हेंबर २०२० पासून कार्यान्वित
- - कलबुर्गी-तेजसुलतान - नोव्हेंबर २०२० पासून कार्यान्वित
सोलापूर विभागात विद्युतीकरणाच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. सोलापूर विभागातील सर्वच गाड्या विजेवर धावतील मात्र त्या कधीपासून धावतील हे सांगणे अजून निश्चित झाले नाही. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या गाड्या वेगात धावतील त्यामुळे प्रवाशांचा वेळ नक्कीच वाचणार आहे.
- शैलेश गुप्ता,
विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे