खरिपासाठी दोन लाख टन खताचे आवंटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:11+5:302021-05-13T04:22:11+5:30
खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी ...
खरीप हंगाम २०२१-२२साठी कृषी विभागातर्फे दरवर्षी पुणे कृषी आयुक्तालयाकडे लागणारे रासायनिक खत तसेच शिल्लक खताचा ताळमेळ घालून आवंटन मंजुरीसाठी पाठवले जाते. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टरवर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गत दोन वर्षांच्या तुलनेत खरीप हंगामात सुमारे एक लाख हेक्टर जादा क्षेत्रावर नियोजन केले आहे. यासाठी लागणारे बियाणे, खताचे नियोजन कृषी विभाग मागील एका महिन्यापासून करीत आहे.
यंदा जिल्ह्यात विविध प्रकारच्या दोन लाख ९१ हजार ९०० मे. टन खताची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने कळविले होते. त्यानुसार पुणे कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० टन आवंटन मंजूर केले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ मे. टन खत शिल्लक राहिले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना हंगामापूर्वी खतांची कमतरता पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
मागणी अन् मंजूर खत
युरिया एक लाख २५ हजार टन (मागणी), ९३ हजार २५० टन (मंजूर), डीएपी ५० हजार टन (मागणी), ३२ हजार ४५० टन (मंजूर), एमओपी ३२ हजार टन (मागणी), १९ हजार ७५० हजार टन (मंजूर), एसएसपी २२ हजार टन (मागणी), २३ हजार ५५० टन (मंजूर), संयुक्त खते ६२ हजार ९०० टन (मागणी), ४५ हजार ३६० टन (मंजूर) अशी जिल्ह्यात एकूण दोन लाख ९१ हजार ९०० मे. टनाची मागणी केली आहे. त्यापैकी कृषी आयुक्तालयाकडून दोन लाख १४ हजार ३६० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. मागील हंगामातील एक लाख चार हजार ६७८ टन खतसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत युरिया तीन हजार ९६६ टन, एमओपी आठ हजार २५३ टन, एसएसपी १३ हजार ९२२ टन, डीएपी आठ हजार ७८३ टन, संयुक्त खते ४६ हजार २६६ असे एक लाख ११ हजार १९० टन उपलब्ध खतापैकी सहा हजार ५१२ टन खतांची विक्री केली आहे.
तालुकानिहाय मंजूर खते
बार्शी ७०० टन, मोहोळ ४०० टन, माढा ७०० टन, माळशिरस १०० टन, करमाळा ३०० टन, पंढरपूर सहा हजार २०० टन, अक्कलकोट ४०० टन असा सुमारे आठ हजार ८०० टन खतांचा संरक्षित साठा ठेवला आहे.
नियोजित पेरणी क्षेत्र
खरीप हंगामात ज्वारी १०० हेक्टर, बाजरी ४९ हजार हेक्टर, सु. बाजरी २१ हजार हेक्टर, भात २५० हेक्टर, तूर ९५ हजार हेक्टर, मूग १९ हजार हेक्टर, उडीद ७० हजार हेक्टर, सं. मका ५५ हजार हेक्टर, भुईमूग सात हजार हेक्टर, सूर्यफूल १२ हजार हेक्टर, तीळ ५०० हेक्टर, सोयाबीन ६५ हजार हेक्टर, धेंचा ७०० हेक्टर, ताग ८०० हेक्टर अशा तीन लाख ७५ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.