'अमृतातेही पैजासी जिंके' आणि 'श्रवणीची होती जिभा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:07 PM2020-08-03T13:07:11+5:302020-08-03T13:07:26+5:30

आणि तोचि हा मी आता। श्रीव्यासांची पदे पाहता पाहता।

'Amritatehi Paijasi Jinke' and 'Shravanichi Hoti Jibha' | 'अमृतातेही पैजासी जिंके' आणि 'श्रवणीची होती जिभा' 

'अमृतातेही पैजासी जिंके' आणि 'श्रवणीची होती जिभा' 

googlenewsNext

ज्ञानेश्वर महाराज 'ज्ञानेश्वरी'मध्ये दोन गोष्टींसाठी खूप हळवे होतात. एक म्हणजे गीतेचे मोठेपण, तर दुसरी गोष्ट म्हणजे सदगुरू आणि महर्षी व्यास यांच्याविषयीचा कृतज्ञताभाव. ज्ञानदेवांनी अठराव्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या प्रयोजनामागील निवृत्तीनाथांच्या कृपाशीवार्दाचे वर्णन केले आहे. सामान्य माणसांच्या प्रतिभेला ब्रह्मरसाचा आस्वाद घडावा आणि तोही आनंदसाम्राज्याचा अधिकारी व्हावा यासाठी तू गीतार्थ सांग, अशी आज्ञा निवृत्तीनाथांनी केली.
मग आतार्चेनि ओरसे।
गीतार्थग्रंथनमिषे।
वर्षला शांतरसे।
तो हा ग्रंथु।। 

सामान्यातल्या सामान्यांना आणि स्त्री-शूद्र, तसेच पीडितांनाही गीतेचा अर्थ सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांनी जी शांतरसाची वृष्टी केली, तोच हा ग्रंथ होय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शांतरसप्रधान आहे. इथे ज्ञानेश्वरीमध्ये 'जेथे शांताचिया घरा...' शांतरसाच्याच घरी इतर नवरस पाहुणचाराला आले आहेत. ज्ञानदेव म्हणतात, माझे साहित्य कसे असावे -
नवरसी भरवी सागरू।
करवी उचित रत्नांचे आगरू।
भावाथार्चे गिरिवरू।
निपजती माये।।
साहित्य सोनियाचे खाणी।
उघडू दे देशियेचिये क्षोणी।

नवरसांचे सागर भरवीत, साहित्य सोनियाचिया खाणी उघडवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्यधाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून प्रतिभेचे पूर्णत्व घेऊन ज्ञानेश्वरी प्रगटली. ज्ञानेश्वर स्वत: निवृत्तीनाथांप्रमाणेच महर्षी व्यासांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात.
आणि तोचि हा मी आता।
श्रीव्यासांची पदे पाहता पाहता।

व्यासांचे जगावर मोठे उपकार की, त्यांनी श्रीकृष्णार्जुन संवादाला ग्रंथाचा आकार दिला आणि व्यासांच्या पाऊलांचा मागोवा घेऊनच मी तो ग्रंथविचार मराठियांच्या श्रवणपथाला आणला. माज्या मराठी भाषेचे मोठेपण मी काय सांगू?
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातेही पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।
मेळवीन।। 

अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी म्हटले आहे, 'अमृतातेही पैजासी जिंके' आणि 'श्रवणीची होती जिभा' ही प्रतिज्ञाच ज्ञानदेवांनी खरी करून दाखवली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कमार्ची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही. ज्ञानदेवांनी तत्त्वज्ञानाला प्रेमाची माधुरी आणली आणि भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला. 'गीतार्थ महाटिया केला लोकायया' असे जरी असले तरी ज्ञानेश्वरी हा स्वत:ही स्वयंपूर्ण ग्रंथ आहे. गीतेच्या एकेका श्लोकावर किती तरी ओव्या ज्ञानदेवांनी लिहिल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर तेराव्या अध्यायातील 'अध्यात्मज्ञान नित्यत्वं' या गीतेच्या एका श्लोकावर ज्ञानदेवांनी २४९ ओव्या लिहिल्या आहेत. ज्ञानदेव नेवासे येथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत होते. सच्चिदानंदबाबा लिहून घेत होते आणि समोर बसलेल्या सामान्य शेतकरी, कष्टकरी, खेडुतांना ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगत हाते. सामान्यांच्याही प्रतिभेला समजेपर्यंत दृष्टान्त द्यावेत हे ज्ञानेश्वरीचे मोठेपण आहे.

Web Title: 'Amritatehi Paijasi Jinke' and 'Shravanichi Hoti Jibha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.