पंढरपूर : गेल्या ६० वर्षात कधी एसटीच्या सरकारमध्ये विलीनीकरण मुद्दा समोर आला नव्हता. मात्र मुद्दामुन हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. एसटी विलनीकरण केले तर राज्यातील सर्व महामंडळाचे कर्मचारी देखील अशी मागणी करतील असे सांगत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील हे देखील मागणी करू शकतात असे पवार यांनी सांगितले.
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर येथे आले होते. महा पूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, विशेष प्रशासकीय अधिकारी सचिन ढोले, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले, शकुंतला नडगिरे, तलाठी राजेन्द्र वाघमारे, मंडळ अधिकारी विजय शिवशरण उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर राज्याला सुख शांती नांदावी. वारीची परंपरा कायम सुरू राहावी, असे साकडे याकडे घातले आहे. कारण सध्या चायना , रशिया व युरोप मध्ये कोरोनाने तोंडवर काढले आहे. आरोग्य विभागाच्या सुचानेनेच नागरिकांनी कोरोना बाबत उपचार घ्यावेत. कोरोना संपला नाही. प्रत्येकाने दुसरा डोस देखील घ्यावा असे आवाहन राज्यातील जनतेला पवार यांनी केले.