सोलापूर : उत्तर प्रदेशातील तंबाखूवर दिल्लीचे लेबल वापरून महाराष्ट्रातील विविध कंपन्यांच्या नावे असलेल्या विड्या व तंबाखू विक्री करणारी टोळी उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गोंदिया येथे जाऊन तीन लाख ३५ हजार ७२ रूपयांची बनावट तंबाखू जप्त केली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे.
रमेशचंद्र वासुदेव गुप्ता (वय ५५ रा. शिवाजीवाडा गोंदिया), हिमांशू गुप्ता (वय २८ रा. आग्रा राज्य उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मोहाेळ तालुक्यातील कुरूल येथील कुलस्वामिनी दुकानात बनावट गाय छाप तंबाखूची पुडी मिळून आली होती. या प्रकरणी कैलास रामेश्वर सोमाणी (वय ५१ रा. मंत्री चंडक कॉम्प्लेक्स, सम्राट चौक सोलापूर) यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे देण्यात आला होता. पोलिसांना उत्तर प्रदेश येथे राहणारा इसम महाराष्ट्रातील संगमनेर (जि. अहमदनगर) च्या मालपाणी कंपनीच्या गाय छाप पुडीचा बनावट माल तयार करीत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा महाराष्ट्रातील गोंदिया शहरात असल्याचे समजले. तेथे जाऊन पोलिसांनी तपासणी केली असता एका घरात बनावट गाय छाप तंबाखूचे तयार केलेले पुडे, बनावट लेबल, छापील पाकिटे, विविध कंपन्यांच्या विड्यांचे लेबल असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी ३ लाख ३५ हजार ७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये दोघांना अटक केली असून अन्य चौघांचा तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार खाजा मुजावर, अंमलदार नारायण गोलेकर, सलीम बागवान, रवी माने, चालक समीर शेख यांनी कामगिरी पार पाडली.
जप्त केलेले साहित्य
० गोंदिया शहरातील घरातून बनावट लेबल, छापील पाकिटे, तंबाखू, इलेक्ट्रिक वजन माप, तंबाखू पुड्यांचे पाकिटे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी पेटी, विविध कंपन्यांचे बिडी, सिगारेट, तंबाखूचे पोते असा मुद्देमाल जप्त केला.