सोलापूर : झेडपीच्या विषय समिती सभापती निवडणुकीत किंगमेकर म्हणून भूमिका बजावणारे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांना पुतणे रणजित शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का दिला. त्यामुळे गेली दहा वर्षे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांना जिल्हा परिषदेचे राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्याच्या अट्टाहासाला तडा गेल्याचे दिसून आले आहे.
झेडपीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने शिवसेना व काँग्रेसच्या मदतीने चमत्कार केल्यानंतर विषय समिती सभापती निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडीचा झेंडा फडकावण्यासाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी भाजपशी हातमिळवणी करणाºया मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. या तक्रारीवरील सुनावणी प्रलंबित राहिली. त्यामुळे पुढील गणित जुळवण्यासाठी आमदार शिंदे यांनी सोमवारी रात्री सोलापुरात ठाण मांडून काँग्रेस व इतर गटाच्या सदस्यांचे मन वळविले होते. भाजपच्या नेत्यांनीही सभापती निवडीसाठी मोठी फिल्डिंग लावली होती. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक, धैर्यशील मोहिते-पाटील हे सदस्यांच्या संपर्कात होते.
दोन्ही गटाने संख्याबळ जुळल्याचा दावा केला होता. निवडणूक कामकाज सुरू झाल्यावर दोन्ही गटातर्फे जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली. मोक्का अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध असलेल्या गोपाळ अंकुशराव यांना या निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तात त्यांना झेडपीच्या सभागृहात आणण्यात आले. सभागृहात आल्यावर उमेश पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा करून आपल्या गोटात घेतले. त्याचबरोबर भीमा आघाडीच्या शैला गोडसे या महाविकास आघाडीसोबत गेल्या. भाजपच्या रुक्मिणी ढोणे गैरहजर राहिल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास वाढला. ऐनवेळी नाराज झालेल्या नितीन नकाते यांची स्वत: रणजित शिंदे व बाळराजे पाटील यांनी समजूत काढली. सर्व सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी रणजित शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. पण ज्यावेळी मतदानासाठी त्यांचे नाव पुकारण्यात आले त्यावेळी सदस्यांचा गोंधळ उडाला. केवळ ३२ मते पडल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल ऐकताच शिंदे तावा-तावाने बाहेर निघून गेले.
निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निर्णय घोषित केल्यावर शिंदे हे मल्लिकार्जुन पाटील यांच्याकडे पाहत अरे काय मतदान करता, इतके करून मला काय असे म्हणत नाराज होऊन सभागृहातून निघून गेले.
गड आला पण...- या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना जल्लोषही करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे यांनी महाविकास आघाडीला तीन पदे मिळाली. गड आला पण, आमचा सिंह गेला. रणजित शिंदे यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला, अशी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीला तीन सभापती मिळाल्याचे ऐकताच माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सभागृहात येऊन आनंद व्यक्त केला. मागे जे झाले ते विसरून जा, आता तीन पदे मिळाली त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे त्यांनी सांगितले. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनीही तेथे येऊन म्हेत्रे यांचे आशीर्वाद घेतले.
बाबाराजे यांची आठवणसन २०१२ मध्ये झेडपीच्या विषय समिती सभापती निवडीवेळी आमदार संजयमामा शिंदे व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह इतर नेत्यांनी मोहिते-पाटील गटाचे उमेदवार बाबाराजे देशमुख यांना पाडले होते. विशेष म्हणजे शरद पवार यांनी बाबाराजे यांना निवडून आणा, असे बजावले होते. तरीही झेडपीवर वर्चस्व ठेवण्याच्या मोहातून डावपेच यशस्वी करण्यात आले होते. त्याच सभागृहात दहा वर्षांनंतर शिंदे कुटुंबातील सदस्याला मोहिते-पाटील यांच्या डावपेचांमुळे पराभूत व्हावे लागल्याची चर्चा झेडपीत रंगली होती.
बाळराजेंचा झेडपी न लढण्याचा विचारराष्ट्रवादी काँग्रेसने इतकी मोठी फिल्डिंग लावूनही रणजित शिंदे यांचा पराभव करून मोहोळ तालुक्यातील आष्टी गटातील विजयराज डोंगरे दुसºयांदा सभापती म्हणून निवडून आले. बाळराजे पाटील यांनी सोशल मीडियावर जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडणुकीदरम्यान निष्ठा, आदेश हे शब्द कुठेच पाहायला मिळाले नाहीत म्हणून भविष्यात निवडणूक लढवायची की नाही, याचा विचार निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नक्कीच करावा, अशी पोस्ट शेअर केली आहे.