मुंढेवाडीत तलाठ्यांच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:26 AM2021-09-22T04:26:14+5:302021-09-22T04:26:14+5:30
पंढरपूर : अवैध वाळूउपसा रोखणा-या तलाठ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न करीत वाळूमाफियांनी कोतवालाला धक्काबुक्की केली आणि तेथून पळ काढला. ...
पंढरपूर : अवैध वाळूउपसा रोखणा-या तलाठ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न करीत वाळूमाफियांनी कोतवालाला धक्काबुक्की केली आणि तेथून पळ काढला.
हा प्रकार मुंढेवाडी भागात सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, मुंढेवाडी गावच्या शिवारात अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी तलाठी मुसाक काजी व कोतवाल महादेव खिलारे हे गेले होते. गावातील मुख्य कमानीजवळ अजनसोंड रोडवरून मुंढेवाडीकडे एक पांढ-या रंगाचे वाहन येताना दिसले. अवैध वाळू वाहतुकीचा संशय आल्याने त्यांनी वाहन थांबण्याचा इशारा दिला.
परंतु वाहन चालकाने तलाठी काझी यांच्या वाहना (एम.एच.१३/ डी.एल. ४०५३) वर चारचाकी वाहन घालण्याचा प्रयत्न केला. पुढे कोंढारकी रोडणे निघून गेला. तलाठी मुसाक काझी यांनी महेश गडदे व राहुल सावंत यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.