सोलापूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सोलापुरात ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. मागील पंचवीस दिवसात जवळपास बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजनचा सप्लाय सोलापूरला झाला आहे. तब्बल एक लाख ऑक्सिजनचे सिलिंडर संपुष्टात आले आहेत. एक ऑक्सिजन सिलिंडर ७ क्युबिक मीटर अर्थात २७ लिटर क्षमतेचा असतो. म्हणजे मागील पंचवीस दिवसात तब्बल २७ लाख लिटर ऑक्सिजनचा वापर कोरोना रुग्णांकरिता झाला आहे.
ऑक्सिजनची मागणी वाढत असली तरी पुरवठादेखील नियमितपणे सुरू आहे, अशी माहिती ऑक्सिजन पुरवठा समितीचे प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी हेमंत निकम यांनी लोकमतला दिली. सोलापूरला पुणे आणि बल्लारी येथून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता. मागील दोन-तीन दिवसांपासून बल्लारी येथून पुरवठा बंद झाला असून आता पुणे आणि ठाणे येथून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवू नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी हातात घेतली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व उपजिल्हाधिकारी हेमंत निकम यांच्या देखरेखीखाली सोलापूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे. रोज पहाटे तीन ते चारपर्यंत ऑक्सिजनचे वितरण सुरू असते.
सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय, कुंभारी येथील अश्विनी रुग्णालय, गंगामाई हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल यासारख्या मोठ्या हॉस्पिटलला रोज तीस ते पस्तीस मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतोय.
ऑक्सिजनचा अनावश्यक वापर होऊ नये, याकरिता प्रशासन दक्ष आहे. जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. कमीत कमी ऑक्सिजन वापरून ऑक्सिजन बचत करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर व ग्रामीण परिसरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
सिलिंडरचा वापर रोटेशन पद्धतीने
१ मे ते १० मे दरम्यान सोलापूरला ५१० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. यातील २९० टन ऑक्सिजन थेट हॉस्पिटलला पुरवला गेला. २२१ टन ऑक्सिजन विविध प्लांट आणि पुरवठादारांकडून वितरित झाला आहे. मागील दहा दिवसात तब्बल ५० हजार सिलिंडर संपले आहेत. १०० सिलिंडरमध्ये एक टन ऑक्सिजनची क्षमता असते. सोलापुरात इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर उपलब्ध नाहीत. पण उपलब्ध असलेले सिलिंडर रिकामे झाल्यानंतर पुन्हा त्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून रुग्णांना दिला गेला. रोटेशन पद्धतीने तब्बल एक लाख सिलिंडर मागील पंचवीस दिवसात संपले आहेत.