१७ दिवस सतत त्याच्याजवळ असूनही मास्क लावलेलं बाळ आईच्या स्पर्शासाठी रडायचं ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:13 PM2020-05-11T15:13:47+5:302020-05-11T15:16:51+5:30
मोठे संकट टळल्याचा आनंद; कोरोनामुक्त दीड वर्षाच्या मुलाच्या आईचा ‘आयसोलेशन’मधील अनुभव
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : माझ्या दीड वर्षाच्या मुलाला कोरोना झाला होता. तो लहान असल्यामुळे काही वेळा हट्ट करायचा. १७ दिवस सतत त्याच्याजवळ असूनही त्याचे हट्ट पुरविता आले नाहीत. आता तो कोरोनामुक्त झाल्याने मोठे संकट टळल्याचा आनंद झाला आहे़ अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या दीड वर्ष वय असणाºया मुलाच्या आईने अनुभव सांगितला. या दीड वर्षाच्या मुलाला आजार असला तरी त्याच्या आई-वडिलांना हा आजार नव्हता.
शेजारच्या महिलेला कोरोना झाल्यामुळे आमच्या कुटुंबीयांना केगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तिथे तीन दिवस राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मुलाला आणण्यात आले. लहान मुलाला हा आजार झाल्याची शहरातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे डॉक्टरही लक्ष ठेवून होते. आता १४ दिवस सिव्हिलमध्ये एकाच वॉर्डात राहायचे म्हणजे भीती वाटत होती. पण मुलगा बरा व्हावा यासाठी हे करणे गरजेचे असल्याचे मुलाच्या आईने सांगितले.
अॅडमिट केल्यानंतर मुलगा बाहेर जाण्याचा हट्ट करायचा. त्यावेळी त्याला समजावून सांगण्याचे कठीण जात होते. खिडकीमधून झाड दाखविणे, तिथे होणाºया हालचाली दाखवून त्याचे मन रमविण्याचा प्रयत्न करायचे.
गोष्टी, गाणी म्हणून दाखवायचो. रडायला लागला की पुन्हा खिडकीमध्ये घेऊन जात होतो. यादरम्यान मीदेखील १७ दिवस चेहºयाला मास्क लावला होता. मुलाच्याही चेहºयाला मास्क लावला होता.
१७ दिवस जवळ असूनही त्याला नीट पाहता आले नाही. तोही मला चेहºयावरील मास्क काढायला सांगायचा पण काही तरी कारण सांगून मी टाळत असल्याचे मुलाच्या आईने सांगितले.
नेमका स्वॅब घेतानाच तो रडायचा
- स्वॅब घेताना स्टीक रुग्णाच्या तोंडात घालावी लागते. मुल फक्त दीड वर्षाचं असल्याने त्याला या प्रक्रियेची भीती वाटत होती. स्वॅब घ्यायला लागले की तो रडायचा. दोनदा अशाच पद्धतीने स्वॅब घेण्यात आले तो त्यावेळी रडल्याने स्वॅबचा अहवाल योग्य येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला कोरोनाची लक्षणेही दिसत नव्हती. नंतर घेतलेल्या चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने त्यावर उपचार करण्यात आले. मला कोरोना होऊ नये यासाठी देखील डॉक्टरांनी औषधे दिली. अतिशय योग्य पद्धतीने डॉक्टर, परिचारिका व सफाई कर्मचाºयांनी काळजी घेतल्याचे मुलाच्या आईने सांगत आभार मानले.