चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव-चपळगाववाडी हा ३ किलोमीटर रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. या रस्त्यावरून तालुक्याच्या उत्तर भागातील जनता सोलापूरला जाण्यासाठी प्रवास करत असते. तसेच या मार्गावरून सध्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. याला अडथळे येत आहेत. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
चारा टंचाईचे नियोजन करा
चपळगाव : यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यामुळे चपळगाव परिसरातील अनेकांच्या शेतात वाफसा येऊन गेला मात्र पिके जळाली. जास्तीच्या पावसाने कित्येकांच्या शेतात गवत वाढल्याने ज्वारीची पेरणीच झाली नाही. अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने ज्वारीसाठी रान उपलब्ध नाही. त्यात पेरणीसाठी उपयुक्त असणारा हंगाम संपत आल्याने पुढील वर्षात पशुपालकांना चारा टंचाई जाणवणार आहे. याचा विचार करून प्रशासनाने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
डोंबरजवळगे- तीर्थ रस्ता दुरुस्तीची मागणी
चपळगाव : डोंबरजवळगे - तीर्थ या गावाला जोडणारा पाच कि.मी.चा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरून प्रामुख्याने शेतकरी, नोकरदार व व्यापारी प्रवास करत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.