रसायनने भरलेले बॅरल जमिनीत पुरले; पोलिसांनी शोधून ‘ते’ उद्ध्वस्त केले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:46 PM2021-07-31T18:46:34+5:302021-07-31T18:46:48+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त
सोलापूर : रसायनने भरलेले बॅरल जमिनीत गाडले. पोलिसांनी ते शोधून काढले. गाडलेले बॅरल्स बाहेर काढून आतील रसायन नष्ट केले. कारवाईवेळी पोलिसांनी ९ लाख ७६ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. गुळवंची आणि मुळेगाव येथे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
सोलापूर ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले होते. यानुसार सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गुळवंची व मुळेगाव या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांच्या टीमने केली.
१२ जणांवर कारवाई
या छाप्याच्या कारवाईत एकूण ९ लाख ७६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये ४६ हजार ४०० लिटर गूळमिश्रित रसायन, त्यामध्ये १९८ प्लास्टिक व ७ लोखंडी बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, अवैध दारूच्या हातभट्ट्या जागेवरच उद्ध्वस्त करून प्लास्टिक, लोखंडी बॅरेल जागीच फोडून गूळमिश्रित रसायन जागेवरच नष्ट केले.
याप्रकरणी एकूण नऊ व्यक्तीविरुद्ध, तसेच अवैध हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या तीन व्यक्ती असे एकूण १२ व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या आरोपींवर करण्यात आलेली कारवाई
गुळवंची येथील छाप्यात संतोष बंडू राठोड, संजय शिवाजी पवार, विनोद धनाजी राठोड, मिथुन गणपत पवार यांच्यावर, तर मुळेगाव छाप्यात उमला रेवू चव्हाण (रा. मुळेगाव तांडा ता. द. सोलापूर), रमेश बाबू राठोड (रा. मुळेगाव तांडा ता. द. सोलापूर ), संजय नामदेव राठोड( रा. मुळेगाव तांडा ता. द. सोलापूर), राम रतन चव्हाण (रा. मुळेगाव तांडा ता. द. सोलापूर), हणमू भिमू राठोड (रा. मुळेगाव ताडा ता. द. सोलापूर) यांच्या, तर हातभट्टी दारू विक्री प्रकरणात राहुल भारत ठोकळे (रा. उळे, ता. दक्षिण सोलापूर), प्रकाश बाबूराव जाधव (रा. गंगेवाडी, ता. दक्षिण सोलापूर), नागेश गोरख पाटोळे (रा. तांदूळवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.