प्रेमवीरांनो सावधान; ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवल्यास तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:00 AM2019-12-13T11:00:56+5:302019-12-13T11:05:47+5:30
एकतर्फी प्रेमवीरांवर दाखल होऊ शकतो गुन्हा
संताजी शिंदे
सोलापूर : एखाद्या मुलगी किंवा महिलेच्या मोबाईलवर एकतर्फी प्रेमातून ‘आय लव्ह यू’चा मेसेज (संदेश) पाठवल्यास संबंधितास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. मुलीने पोलिसात तक्रार केल्यास तत्काळ भादंवि ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो.
सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. सोबत व्हॉट्सअॅप हे अॅप सर्रास वापरले जात आहे. मुलींच्या मोबाईल नंबरवरचा व्हॉट्सअॅप स्टेटस पाहणे, चॅटिंग करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. व्हॉट्सअॅप, मेसेंजर किंवा पूर्वीपासून मोबाईलमधील मेसेजच्या माध्यमातून एखाद्या मुलीस किंवा महिलेस थोडक्यात संदेश पाठवला जातो. फोनवर बोलता येत नसेल तर टायपिंग करून संवाद साधला जातो. सध्या मोबाईलच्या जमान्यात प्रत्येक व्यक्ती दररोज कोणाशी ना कोणाशी संपर्क साधत असते. शाळा, कॉलेजमधील मुले, मुलीही मोबाईलचा वापर करीत आहेत. मोबाईलमुळे जग जवळ आले आहे. संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. आधुनिक अॅन्ड्रॉईड मोबाईल आल्याने कामे सोपी झाली आहेत. व्यक्ती कितीही व्यस्त असली तरी ती आपल्या व्यक्तीला मेसेजच्या माध्यमातून संपर्क करत असते. एकावेळी अनेक कामे करणे आता सहज शक्य झाले आहे.
मोबाईलचे अनेक फायदे असले तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच पुढे येत आहेत. मुली व महिलांशी जवळीक साधण्यासाठी मोबाईलचा वापर केला जात आहे. मैत्रीचे मेसेज पाठवत असताना अचानक एखादा भावनिक करणारा संदेश पाठवला जातो. मुलीचा किंवा महिलेचा प्रतिसाद पाहून पुढे आणखी काही मेसेज पाठवले जातात. काही गोष्टी मोबाईलवर बोलता येत नाहीत, मात्र मेसेजच्या माध्यमातून त्या व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकतर्फी प्रेमातून भावना अनावर झाल्यास मुलीस किंवा महिलेस ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करतात. असा मेसेज आल्यानंतर अचानक मुलीस किंवा महिलेस वाईट वाटते. असे कृत्य थांबवण्यासाठी संबंधित महिलेने जर पोलिसात तक्रार दिली तर मेसेज पाठवणाºयावर भादंवि कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. या कलमाअंतर्गत न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला किंवा तरुणाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
व्हॉट्सअॅपचा वापर चांगल्या कामासाठी करा : अरुण फुगे
- मोबाईलवर संपर्क साधण्याचे प्रकार वाढले आहेत. कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी व अन्य क्षेत्रात मित्र, मैत्रिणी होतात. व्हॉट्सअॅप, मेसेंजर किंवा मोबाईल मेसेजच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क ठेवतात. कोणी जाणीवपूर्वक मोबाईल नंबर मिळवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असतो. बहुतांश महिला, मुली काही लोकांना टाळतात. मात्र सीम कार्ड बदलून किंवा अज्ञात नंबरवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. अशामध्ये जर एकतर्फीमधून ‘आय लव्ह यू’सारखे मेसेज पाठवले तर महिलेच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य घडते. याची तक्रार आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.