सीमेवर भारतीय मुलांवर लाठीमार; लाजीना सोलापुरात दाखल; डोळ्याला झाली इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 04:34 PM2022-03-02T16:34:31+5:302022-03-02T16:34:38+5:30
डोळ्यावर स्प्रे मारला : उपचार घेणार
सोलापूर : रशिया - युक्रेन वादात भारत सरकार तटस्थ राहिल्याने त्याचा राग हा भारतीय विद्यार्थ्यांवर काढला जात आहे. सोलापूरची लाजीना सय्यद ही विद्यार्थिनी रोमानियाच्या सीमेवर असताना तिथे विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या मारहाणीतून लाजीनाला मार लागला नसला तरी, तिथे मारलेल्या स्प्रेमुळे तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. लाजीना आता भारतात दाखल झाली असून पुण्यातील नातेवाईकाकडे थांबली आहे.
डोळ्याला इजा झाली असताना लाजीना सोमवारी रात्री ९.३० वाजता बुकास्टर शहरातून विमानाने निघाली. मंगळवारी नऊ वाजण्याच्या सुमारास ती मुंबईत आली. तिथून ती पुण्यातील नातेवाईकांकडे थांबली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्यावर उपचार घेणार आहे.
---------
दोन मुली हंगेरीसाठी निघाल्या
युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी हंगेरी, रोमानिया व पोलंड हे देश जवळ आहेत. युक्रेनमध्ये शिकत असलेल्या सोलापूरच्या दोन मुली हंगेरीसाठी निघाल्या आहेत. यातील एक मुलगी सोलापूर शहरातील असून दुसरी सांगोला येथील आहे. तिथे गेल्यावर विमानाची व्यवस्था कधी होईल, यावर त्या सोलापुरात कधी पोहोचणार हे अवलंबून आहे.
------
बर्फ पडल्याने बस रद्द
युक्रेनमधील डेनप्रो शहरात सोलापुरातील विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. मात्र, तिथे बर्फ पडल्याने बुक केलेली बस रद्द झाली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना पुन्हा बसची व्यवस्था होईपर्यंत वाट पाहावी लागत आहे.
------
विद्यार्थ्यांना शहर सोडण्याचे आदेश
रशिया-युक्रेन या देशांतील वाद थांबताना दिसत नाही. कीव्ह आणि खारकीव्ह येथे हल्ले होत आहेत. त्यामुळे तिथले नागरिक हे तुलनेने सुरक्षित असलेल्या डेनप्रो शहरात येत आहेत. त्यामुळे आता डेनप्रो शहरावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करून डेनप्रो येथील प्रशासनाने विद्यार्थ्यांना शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. या शहरातील एका बंकरमध्ये सोलापूरचे १२ विद्यार्थी अडकले आहेत.