सोलापूर : महात्मा बसवेश्वरांचा समतावादी मार्ग हा फक्त भारतच नव्हे; तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या समताधिष्ठित कार्याचा साक्षीदार हा सोलापूर जिल्हा असून त्यांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पुनीत झाला आहे.
महात्मा बसवण्णा यांचे चरित्र समजून देण्यातही सोलापूरचे योगदान महत्त्वाचे आहे. सोन्नलगीचे नायक शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी आपल्या अनेक वचनांत बसवण्णांची थोरवी गायली आहे. संतश्रेष्ठ नामदेव रायांच्या अभंगातून इतर संतांच्या चरित्राची ओळख व्हावी त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या वचनांतून बसवण्णांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि समकालीन शरणांचे यथार्थ दर्शन घडते.
डॉ. जयदेवीताई लिगाडे, शशिकलाताई मडकी, स्वरूपाताई बिराजदार या तीन पिढ्यांच्या सोलापूर कन्यांनी बसवण्णांच्या वचनांचा मराठीत जागर केला. शिवाय बसवण्णा आणि सिद्धरामेश्वर यांचा परस्पर अनुबंधावरही मुबलक काम केले आहे. भगवानदास तिवारी, डॉ. इरेश स्वामी, सिंधूताई काडादी, चन्नवीर भद्रेश्वरमठ यांच्यासह अनेक लेखक-अनुवादकांनी बसव साहित्याच्या प्रसार व प्रचारात योगदान दिल्याचे दिसून येते. मंगळवेढ्याशी संबंधित असलेले बंगळुरूस्थित शिवकुमार पावटे यांनी बसवण्णा आणि मंगळवेढा या विषयावर स्वतंत्र संशोधन केले आहे.
मंगळवेढ्यातील वास्तव्याचा ग्रंथात उल्लेख
बाराव्या शतकात बसवण्णांनी उभारलेल्या समग्र ‘कल्याणक्रांती’ आंदोलनाची मुहूर्तमेढ मंगळवेढ्यात झाली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही बसवण्णांची खऱ्या अर्थाने कर्मभूमी आहे. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी होती. महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढ्यामध्ये राज्य सेवा केली. मंगळवेढ्यातील वास्तव्याबाबत हरिहर कवी रचित बसवराज देवर रगळे या चरित्रग्रंथात तीन प्रसंग सविस्तरपणे रेखाटण्यात आली आहेत.
महात्मा बसवेश्वर हे माणसाच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे काम केले. समाधिष्ठित समाज निर्मितीसाठी त्यांनी भेदाभेद टाळणे, स्त्रियांना समान दर्जा देणे याबाबतचे कार्य केले. परमेश्वर हा आपल्या मनात असून त्याला पाहण्याची दृष्टी त्यांनी सर्वांनाच दिली. त्यांचे विचार व कार्य हे आजही कालसुसंगत आहे.
- सिंधूताई काडादी, अध्यक्षा, बसव केंद्र
महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढातील वास्तव्य हे ८ ते १२ वर्षांचे असावे. मंगळवेढ्यामध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण झाली. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी होती. बसवण्णांनी मंगळवेढ्यात राज्य सेवा सुरू केली. त्यानंतर राजा बिज्जळांनी आपली राजधानी मंगळवेढ्याहून कल्याणला आणली. येथे बसवण्णांकडे प्रधानमंत्रीपद देण्यात आले.
- चन्नवीर भद्रेश्वरमठ, बसव साहित्याचे अभ्यासक