सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. तरीही सोलापूरकरांनी रक्ताचे श्रेष्ठ दान देत अनेकांचा जीव वाचवला. आता संभाव्य तिसरी लाट तसेच नॉन कोविड रुग्णांसाठीही रक्तदात्यांची साथ मिळेल, अशी अपेक्षा रक्तपेढ्यांनी व्यक्त केली आहे.
मागील एक वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे रक्ताचे संकलन खूप कमी प्रमाणात झाले. त्यातच लसीकरणाला सुरुवात झाल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली. अनेक रक्तपेढ्यांमध्ये थॅलेसेमिया आजार असलेल्या मुलांना नियमितपणे रक्त देण्यात येते. त्यावेळी सर्वात मोठी अडचण निर्माण झाली. यावर उपाय म्हणून रक्तपेढ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या नियमित रक्तदात्यांना फोन करून रक्तदान करण्याची विनंती केली. या विनंतीला प्रतिसाद देऊन अनेकांनी रक्तदान केले.
एरव्ही अनेक रक्तदाते एकत्र येत असलेल्या शिबिरात ५० पेक्षा जास्त रक्तदान होत असते. लॉकडाऊनमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे फक्त दोन रक्तदात्यांसाठी व्हॅन रक्तदात्यापर्यंत नेण्यात आली. अनेक सोसायट्यांमध्ये छोट्या-छोट्या शिबिरामधून रक्त संकलित करण्यात आले.
------
सध्या रक्ताचा ६० टक्के तुटवडा
प्रत्यक्षात पहिला किंवा दुसरा डोस झाल्याच्या चौदा दिवसानंतर रक्तदान करता येते. तरीही नागरिकांमध्ये रक्तदान करण्याबाबत संभ्रम आहे. अजूनही शाळा महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. त्यातच नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यात ६० टक्के तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात १४ तर जिल्ह्यामध्ये २० रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.
रुग्णालयातील नॉन कोविड सेवा पूर्ववत होत आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी रक्ताची गरज पडणार आहे. रक्तदाते नेहमीप्रमाणे सहकार्य करतील अशी खात्री आहे.
- अशोक नावरे, प्रशासकीय अधिकारी, दमाणी रक्तपेढी
सध्या रक्ताचा तुटवडा पुन्हा जाणवत आहे. रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे. या १५ दिवसात रक्ताचे संकलन खूप कमी झाले आहे.
- डॉ. शैलेश पटणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी