सोलापूर: पुणे येथील कामे आटोपून परतत असलेला प्रवासी गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर झोप घेऊ लागला. दौंड रेल्वे स्थानकानंतर सोलापूर जिल्ह्यातील जिंती रेल्वे स्थानक आले. अन खाकीवाला आला अन प्रवाशांनो, खिडक्या बंद करा पटकन, असे फर्मान सोडले. झोपेत असलेले प्रवासी दचकन उठले. गाढ झोप घेणाऱ्यांची झोपमोड झाली.
सगळे इकडे तिकडे पाहू लागले. प्रवाशांनी खिडक्या पटापट बंद केल्या. महिलांनी दागिने आवरले. मोबाइलमध्ये गुंग असलेल्यांनी फोन खिशात ठेवले. माहिती नसलेल्यांना काय झालं, असं विचारणा करू लागले. दोन चार पुटपुटले रोजचे आहे हे...
रात्री ८:२५ वाजता सुरू झालेला खेळ ८:४५ ला संपला. जिंती रेल्वे स्थानकापासून सुरू झालेला भीतीचा प्रवास कुर्डुवाडी रेल्वे स्थानक आल्यानंतर संपला. तेथे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पुण्यापासून सुरू झालेला प्रवास दौंडपासून भयभीत होण्यास सुरुवात झाली तर कुर्डुवाडीत सुटकेचा श्वास सोडल्यासारखे केले.
उपाययोजना करायला हव्या-
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्येच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची दुर्दैवी वेळ प्रवाशांवर रोज येत आहे. यासाठी संबंधितांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. आरपीएफ, तिकीट निरीक्षक, लोहमार्ग पोलिसांमध्ये समन्वय असल्यास आणखी सोपे होईल. सध्या असलेले मनुष्यबळही कमी पडत आहे. चोरट्यांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी बऱ्याच वेळा गोळीबारदेखील झाला आहे.
जिंती ते कुर्डुवाडीपर्यंत ब्लॅक स्पॉट-
सोलापूर रेल्वे स्थानक हे उत्तर भारताला दक्षिण भारताला जोडणारे रेल्वे स्थानक असल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्रवासी हे प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना करमाळा तालुक्याच्या टोकाला असलेल्या जितीपासून माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानक गाठेपर्यंत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. जिंतीपासून पारेवाडी, वाशिबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुईवाडीपर्यंतचा प्रवास हा ब्लॅक स्पॉट होत आहे.
या भागातच का चोरी-
जिंती ते कुर्डुवाडी हा भाग प्रामुख्याने उजनी धरणाचा बॅक वॉटर म्हणून ओळखला जातो. जवळपास ८० किमी परिसर अशा मोठ्या परिसरामध्ये पसरलेला हा भाग आहे. या भागामध्ये झाडे, शेती, चिलार यांची संख्या मोठी आहे. यामुळे चोरी करून चोरट्यांना पळण्यास मोठी संधी मिळते. शिवाय रेल्वे रुळाजवळ पसरलेल्या खडीचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात. विस्तृत भागामध्ये पसरलेल्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांनादेखील अवघड जाते.
चोरीची अशी आहे पध्दत-
रेल्वेची सिग्नल व्यवस्था बंद करून चोरी करण्याचे प्रकार जास्त आहे. रेल्वेच्या सिग्नलच्या वायर तोडणे, सिग्नल लाईटवर काळा कपडा टाकणे, चेन ओढणे, सर्कीट ब्रेक करण्याचे प्रकार चोरट्यांकडून केले जातात. कधी कधी तर रेल्वे रुळांवरच दगड ठेवण्याचेही प्रकार झालेले आहेत. या प्रकारानंतर गाडी थांबल्यानंतर स्टेशनपासून लांब असलेल्या शेवटच्या बोगीमध्ये चोरी करतात.
पेट्रोलिंगवर भर-
दौड़ते कुईवाडी हे अंतर जास्त आहे. रेल्वेमध्ये होणारी चोरी, दरोडा रोखण्यासाठी सशस्त्र जवानांकडून पेट्रोलिंग केली जात आहे. तसेच कोम्बिंग ऑपरेशनदेखील केले जाते. प्रवाशांनी चोरट्यांना चोरीची संधी न देता सुरक्षेची काळजी घ्यावी.- अमोल गवळी, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग कुईवाडी ठाणे