दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीचा भगवंत रथोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:02+5:302021-07-20T04:17:02+5:30
प्रतिवर्षी आषाढी एकादशीचा उपवास वारकरी पंढरपुरात करून, मराठवाडा व विदर्भातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या या बार्शी भगवंत नगरीत येऊन भगवंताचे ...
प्रतिवर्षी आषाढी एकादशीचा उपवास वारकरी पंढरपुरात करून, मराठवाडा व विदर्भातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या या बार्शी भगवंत नगरीत येऊन भगवंताचे दर्शन करून पुढे जाण्याची आजपर्यंतची प्रथा आहे, परंतु कोरोना महामारीमुळे यंदा दुसऱ्या वर्षीही या दिंड्यांना आपापल्या गावीच थांबावे लागले आहे. काही दिंड्या भगवंताचे दर्शन घेऊन पंढरीकडे प्रयाण करतात, तर काही दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनानंतर बार्शीत भगवंत दर्शनाला येतात. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी आता या दिंड्यांना बार्शीत व पंढरपुरातही जाता येणार नाही.
दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने भगवंत मंदिरासह बार्शीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बार्शीकरांना हे अनुभवता आले नाही, यंदाच्या वर्षीही कोरोनामुळे गर्दी होऊ नये, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार दिंड्यांची वारी रद्द झाली आहे. आषाढी एकादशी दिवशी भगवंत रथोत्सवही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. तोही या वर्षी रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
---