सोलापूर - आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी आणि संबंधित निर्णय बदलून सहकार्य करावे अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्यावतीने सोलापूर येथील जिल्हा परिषद गेटसमोर भजन आंदोलन करून देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, ज्योतीराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार, कुमार गायकवाड, किशोर धायगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये " पंढरीची वारी जयाची ये कुळी | त्याची पाय धुळी लागो मज || " या उक्ती प्रमाणे वारी विषयी धारणा खूपच मोठी असून नित्य नेमाला खूप मोठे महत्व आहे. तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते.आत्ता फक्त राज्य शासन निर्बंध आहेत. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे. त्यामुळे आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.