मोठी बातमी; वीज पडून १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार; सांगोला तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:00 AM2021-05-30T10:00:21+5:302021-05-30T10:01:12+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सांगोला - चिंचोली (वाघमोडेवाडी) ता. सांगोला येथील मराठी शाळेच्या पाठीमागे शेळ्या-मेंढ्याच्या वाडग्यावर वीज पडून लहान मोठ्या ११ मेंढ्या, २ शेळ्यासह १ पाठ अशा १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्या. ही घटना शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.
चिंचोली ( वाघमोडे वस्ती) येथील मेंढपाळ शिवाजी विष्णू गडदे यांचा शेळ्यामेंढ्या पालन व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी दिवसभर शेळ्या-मेंढ्यांना चारून सायंकाळी ६ च्या सुमारास घरा शेजारील वाडग्यात कोंडल्या होत्या दरम्यान रात्री ९ च्या सुमारास अवकाळी पावसात अचानक त्यांच्या वाडग्यावर वीज कोसळल्याने ११ लहान मोठ्या मेंढ्या व २ शेळ्यांसह१ लहान पाठ अशा १४ शेळ्या-मेंढ्या जागीच मृत्यू पावल्या. या घटनेची माहिती पोलीस पाटील हरिदास बेहेरे पाटील यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना दिली . तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट देवून मृत शेंळ्या मेंढ्याचा पंचनामा केला.
या घटनेत मेंढपाळ शेतकरी शिवाजी गडदे यांचे सुमारे ३:५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी मृत शेळ्या- मेंढ्याचे शवविच्छेदन केले. यावेळी परिचर दयानंद केंगार उपस्थित होते.