सोलापूर : दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वेने १४ ते २८ ऑक्टोबर २०२१ असा एकूण १४ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सिद्धेश्वर, हुतात्मासह १५ एकस्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने शनिवारी दिली.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम संपले आहे. दरम्यान, इंटरलॉकिंगचे काम १४ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे. तब्बल १४ दिवस ब्लॉक घेऊन काम केले जाणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही बाजूच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला आहे. सोलापूर विभागातून धावणाऱ्या १५ गाड्या रद्द, तर ३५ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. याशिवाय सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वे ही कुर्डूवाडी, मिरज, पुणे मार्गे धावणार आहे. सांगोला-शालीमार किसान रेल्वे कुर्डूवाडी, लातूररोड, परभणी, पूर्णा, अकोला बडनेरा मार्गे धावणार असल्याचेही सांगण्यात आले.
----------
रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस गाड्या
मुंबई-गदग, गदग-मुंबई, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर, मुंबई-लातूर, लातूर-मुंबई, मुंबई-बिदर, बिदर-मुंबई, म्हैसूर-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-म्हैसूर, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड हैदराबाद-हडपसर, बिदर-मुंबई, पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा यापूर्वीच १७ ऑक्टोबरपर्यत रद्द करण्यात आली आहे. आता या गाड्या २८ऑक्टोबरपर्यत रद्द करण्यात आल्या आहेत.