आप्पासाहेब पाटील
सोलापूर : दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच रेल्वेच्या अनेक मार्गांवरील आरक्षण फुल्ल झाले आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा अगोदरपासून बेत आखला आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटाचे वेटिंग १०० च्या पुढे गेले आहे. अनेकांनी खासगी वाहनंही बुकिंग करून ठेवली आहेत. पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी अन् कामानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक लोक मूळगावी येत असल्याने दिवाळीत रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. त्यातच सर्वकाही सुरळीत सुरू झाल्याने सर्वत्र आनंद, उत्साह व समाधान दिसून येत आहे. त्यातच अनेक कंपन्यांना चांगला फायदा होत असल्याने अनेकांच्या वेतनातही चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेचे वेटिंग लिस्ट वाढत आहे. सोलापूरहून दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, कोल्हापूर अशा मोठमोठ्या शहरांना जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट आताच बुकिंग करून ठेवा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
--------------
सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
- - सिद्धेश्वर एक्स्प्रेस,
- - उद्यान एक्स्प्रेस,
- - कोणार्क एक्स्प्रेस,
- - नागरकोईल एक्स्प्रेस,
- - गदग एक्स्प्रेस,
- - म्हैसूर एक्स्प्रेस
----------
वेटिंग पोहाेचले १०० च्या वर
मुंबई, पुणे, हैद्राबाद व अन्य महत्त्वाच्या शहराकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट वेटिंग मिळत आहे. दिवाळीत अनेक लोक पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देतात. शिवाय मूळचे सोलापूरचे पण कामानिमित्त बाहेरगावी असलेले लोक सणानिमित्त सोलापूरला येतात. त्यानंतर परत कामाच्या ठिकाणी जातात त्यामुळे दिवाळीत रेल्वे गाड्यांचे वेटिंग वाढल्याचे दिसून येत आहे.
----------
खासगी वाहनांकडे ओढा
रेल्वे, एसटी गाड्यांचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण खासगी वाहनाने प्रवास करण्याचे नियोजन आखत आहेत. शिवाय खासगी चारचाकी गाड्या भाड्याच्या दरात घेऊन अनेक जण पर्यटक, धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी जात आहेत. सलग सुट्ट्यांमुळे लोक आता बाहेर पडू लागले आहेत.
-------------
भाडेवाढीवर आरटीओची नजर
सण, उत्सव काळात अनेक खासगी वाहने भरमसाठ भाडेवाढ करतात, अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर असणार आहे. ज्यादा प्रवास भाडे आकारल्यास संबंधित प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
----------
अशा आहेत दिवाळीत सलग सुट्ट्या..
यंदा दिवाळी सण ऑक्टोबर २२ पासून सुरू होणार आहे. शनिवार २२ ऑक्टोबरला (धनत्रयोदशी), रविवार २३ ऑक्टोबर, सोमवार २४ (नरक चतुर्दशी), मंगळवार २५ (अभ्यंगस्नान), २६ ऑक्टोबर (बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज) हे सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे शनिवार ते बुधवार हे पाच दिवस शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा बेत आखला असल्याचे सांगितले.