लापूर : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक औषधांच्या दुकानांमधून सेल्फ किट्स खरेदी करून घरच्या घरी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे ‘सेल्फ अँटिजेन कोविड किट’च्या विक्रीत १५ टक्क्यांंनी वाढ झाली आहे. या किटचे नेझल ठसका लागेपर्यंत, डोळ्यातून पाणी येईपर्यंत नाकात घालून टेस्ट केली जात आहे.
सर्दी, खोकला, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, सौम्य लक्षणे, रुग्णालयात गर्दीत घेऊन जाण्याची भीती वाटते. त्यामुळे लोक घरीच कोरोना चाचणीसाठी उपलब्ध किट्सचा वापर करून टेस्ट करत आहेत. रॅपिड अँटिजेन टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने मागील वर्षी मंजुरी दिली. मात्र, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधित माहिती मोबाईल ॲपच्या साहाय्याने पोर्टलवर नोंदवणे अपेक्षित असते. विलगीकरणात राहावे लागण्याच्या भीतीने नागरिकांनी पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपवली आणि ते गर्दीत मिसळत राहिले तर साथ आटोक्यात येण्याऐवजी संसर्ग वाढत राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
---
अशी होते सेल्फ चाचणी
सेल्फ किटच्या माध्यमातून घरच्या घरी १५ मिनिटांत ही चाचणी होते . सेल्फ किटच्या माध्यमातून चाचणी अहवाल नोंद करण्यासाठी ‘मायलॅब’ हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागते. यामध्ये किटवरील कोड स्कॅन केल्यानंतर काही मिनिटांत प्रिंटेड रिपोर्ट मिळतो.
---
असा होतो फायदा
मेडिकलमध्ये २५० रुपयांत किट मिळते. १५ मिनिटांत ही चाचणी करता येते. तर लॅबमध्ये चाचणीसाठी २५० रुपये खर्च करूनही किमान २४ तास वेटिंग करावे लागते. परिणामी सरकारी आणि खासगी लॅबवरील ताणही कमी होतो.
---
असा होतो तोटा
चाचणीनंतर बाधित अहवाल आल्यानंतरही काही जणांकडून कोड स्कॅन केला जात नाही. परिणामी प्रशासनाकडे याची नोंद होत नाही. बाधितांकडून खबरदारी घेतली जात नसल्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होतात. शिवाय बाधित रुग्णसंख्या लपवल्याचा आरोपही प्रशासनावर होतो.
---
काय म्हणतात औषध विक्रेते
सध्या सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेले आहेत मागील १५ दिवसांपासून सर्दी, खोकला, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, सौम्य लक्षणे असलेले नागरिक सेल्फ ॲंटिजेन कोविड किट ची मागणी वाढली आहे.
- सिद्धराम चाबुकस्वार, औषध विक्रेते
--
मागील दोन लाटेच्या तुलनेत गेल्या १० दिवसांमध्ये होम टेस्टिंग किटची मागणी खूप वाढली आहे. सेल्फ ॲंटिजेन कोविड किट मागणी १० ते १५ टक्क्यांनी मागणी वाढली आहे.
^ गणेश काटकधोंड, औषध विक्रेते
--