मोठी बातमी; आषाढी वारीच्या काळात १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरीत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:56 AM2021-06-23T11:56:44+5:302021-06-23T11:56:50+5:30
पोलीस अधीक्षक सातपुते : परिसरातील दहा गावांचाही समावेश
पंढरपूर (जि. सोलापूर) : गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात अजूनही संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे आषाढी यात्रेदरम्यान १७ ते २५ जुलैपर्यंत शहर आणि परिसरातील १० गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघण्याची शक्यता आहे.
यंदा मानाच्या सर्व १० पालख्या बसमधून दशमी दिवशी पंढरपूर येथे येणार असून, पौर्णिमेला परत जाणार आहेत. त्यामुळे १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याकाळात सोलापूर जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार असून, परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तरीही काही भाविक पंढरपूरकडे आलेच तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवले जाणार आहे. शासनाकडून जेवढ्यांना आषाढी यात्रेसाठी येण्यास परवानगी मिळणार आहे, तेवढेच महाराज पंढरपुरात येतील, असे सातपुते म्हणाल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मागील वर्षीही अशाच पध्दतीने आषाढीच्या काळात भाविकांना पंढरीत येण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर वर्षभरातील सर्वच यात्रांच्या बाबतीत हीच पध्दत अवलंबली गेली आहे.
चंद्रभागा नदी परिसरात कलम १४४
आषाढी यात्रा काळात चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून परिसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे. ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे, त्याच भाविकांना पासेस देऊन नगर प्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघतील, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.