सोलापूर : एखादी वस्तू होलसेल अर्थात घाऊक दरामध्ये घेतल्यानंतर ती वस्तू कमी दरात मिळते, आपल्या सर्वांना याची जाण आहे, पण घाऊक दरात डिझेल खरेदी केल्यामुळे एसटी महामंडळाला चक्क तोटा होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी आता एसटी विभाग किरकोळ दरात डिझेल खरेदी करणार आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागानुसार खासगी पंपाची नेमणूक केली जाणार आहे. दरम्यान, सोलापुरात प्रति लीटर नऊ रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे.
किरकोळ आणि घाऊक दरात झालेल्या वाढीमुळे एका लीटरमागे जवळपास नऊ रुपयांचा फरक आहे. यामुळे सोलापूर विभाग एसटी महामंडळाचे दिवसाला जवळपास ५० हजार ते एक कोटींचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळ आता खासगीमधून डिझेल खरेदी करणार आहे. यासाठी टेंडर मागविण्यात आले असून याबाबत सोमवारी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सध्या जिल्ह्याच्या सीमेवर डिझेल जवळपास ९३ रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे, तर एसटी महामंडळ ज्या कंपनीकडून डिझेल खरेदी करते त्या कंपनीकडून १०२ रुपये प्रति लीटर दराने डिझेल मिळते. अर्थात एसटीला नऊ रुपये प्रति लीटर दराने सोलापुरात फटका बसत आहे. हा फरक राज्यभरात जवळपास २० रुपये प्रति लीटरपर्यंत आहे. यामुळे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी सोलापूर विभागासह राज्यातील सर्वच एसटी विभागांमध्ये आता खासगी पंप चालकांकडून डिझेल खरेदी केले जाणार आहे.
उधारीला प्राधान्य
एसटी महामंडळाकडून खासगी पंप चालकांकडून बंद लिफाफ्यामधून निविदा मागविण्यात येत आहेत. यामध्ये जे डिझेल पंप आगाराच्या जवळ आहेत आणि जे पंप क्रेडिट म्हणजेच उधारीवर देण्यास तयार असणार आहेत. त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
सोलापुरात आहेत ७३० एसटी गाड्या
- सोलापूर विभागातील एकूण बसेस - ७३०
- प्रवासी वाहतूक - ६७०
- मालवाहतूक - ३२
- विभागात एकूण लागणारे डिझेल टँकर - ४ ते ५ ( बारा हजार लीटरचा प्रत्येकी टँकर)