मोठी बातमी; कोरोनामुळे सोलापुरात सार्वजनिक शिवजयंतीला परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 11:21 AM2021-02-06T11:21:57+5:302021-02-06T11:22:46+5:30
कोरोनाचे नियम : मंडप टाकण्यास बंदी, पूजेसाठी पाच जणांची उपस्थिती
सोलापूर : सोलापुरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती भव्य स्वरूपात साजरी केली जाते. जयंती काळात मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. पण यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या जयंतीला पोलिसांकडून परवानगी असणार नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिली.
कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षभरात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. अजूनही कोरोनाचे सावट संपलेले नाही. सोबतच शासनाकडूनही सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे आणि कोरोनाचे सर्व नियम २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
शिवजयंतीसाठी नियम
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना महाराजांच्या मूर्तीचे, प्रतिमेचे पूजन कार्यालयात, बंदिस्त ठिकाणी पाचजणांच्या उपस्थितीतच करण्यास परवानगी आहे. शिवजयंतीच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नाही, सार्वजनिक रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकून मूर्ती, प्रतिमा लावण्यास बंदी आहे.
लॉकडाऊनचे नियम २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. सोबतच सध्या मिरवणुका आणि जयंती साजरी करण्यावर निर्बंध आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अशा सूचना आहेत. यामुळे यंदा मिरवणुका जयंती साजरी करता येणार नाही. मात्र प्रतिमापूजन पाच लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
- डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपायुक्त