मोठी बातमी; हुबेहुब दिसणाऱ्या चैतन्यचा पेपर देताना योगेशला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 01:23 PM2022-03-20T13:23:04+5:302022-03-20T13:23:16+5:30
दयानंद कॉलेजमधील प्रकार : केंद्रसंचालकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा सुरळीत होत आहेत. शनिवारी दयानंद कॉलेजच्या केंद्रात हुबेहुब दिसत असल्याचा फायदा घेत चैतन्यऐवजी योगेश परीक्षेला बसल्याचे आढळले. त्याला केंद्रसंचालकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. योगेश पवार असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
राज्यभरात बारावीच्या परीक्षा होत असताना, राज्यात काही ठिकाणी कॉपी प्रकरण उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर सोलापुरात खबरदारी घेण्यात येत आहे. अशाचप्रकारे सोलापुरातील दयानंद आर्ट्स कॉलेजच्या केंद्रात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शनिवारी ३ ते ६ यावेळेत बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर सुरू होता. यात योगेश पवार हा बनावट विद्यार्थी आपल्यासारखाच दिसणारा भाऊ चैतन्यऐवजी परीक्षेला बसला. परीक्षा सुरू होतात ही बाब जेव्हा परीक्षकाला कळाली; तेव्हा त्याने लगेच संबंधित विद्यार्थ्याला विचारणा केली. प्रश्नांचा मारा होताच योगेश हा अडखळला. यामुळे केंद्रसंचालकांनी लगेच याबाबतची घटना वरिष्ठांना कळवत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
--
योगेश कॉमर्सच्या दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी
योगेशने यापूर्वी चैतन्यचा इंग्रजीचा पेपरही दिला होता, असे त्याने कबूल केले. चैतन्य अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे योगेशने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वस्तूत: योगेश हा बी. कॉमच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. परीक्षा देताना केंद्रसंचालकाला योगेशचे हावभाव वेगळे वाटले. त्यामुळे योगेशला हटकले. त्याला परीक्षा हॉलच्या बाहेर नेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने कबुली दिली, अशी माहिती सूत्राने दिली.
बारावीच्या परीक्षा सुरू असताना दयानंद महाविद्यालयात एक विद्यार्थी डुप्लिकेट आढळला आहे. त्याला केंद्रसंचालकांनी पकडून त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे. योगेश पवार असे पकडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो आपल्या भावाऐवजी परीक्षेला बसला होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
- भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक