मोठी बातमी; कंटनेरची दुचाकीला धडक; देवदर्शनाहून परतताना तिघांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 10:37 PM2022-03-18T22:37:09+5:302022-03-18T22:38:48+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सांगोला : जतहून श्री यल्लमा देवीचे देवदर्शन आटपून घराकडे परतणाऱ्या बुलेट दुचाकी व कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सोनंद (ता. सांगोला) येथील चव्हाण मळ्याजवळ घडला. अपघात घडताच कंटेनरचालक स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला.
किरण सुधाकर गुजले (वय २३, रा. खर्डी, ता. पंढरपूर), अक्षय अण्णासाहेब मलमे-पाटील (२३, रा. कोसारी, ता. जत) व अजित शशिकांत मंडले (२४, रा. नेलकरंजी, ता. आटपाडी दोघेही सध्या खर्डी, ता. पंढरपूर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
शुक्रवारी सकाळी खर्डी येथून तिघेजण (एमएच १३ बीटी ४९३३) बुलेट गाडीवरून जत (जि. सांगली) येथील श्री यल्लमा देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन आटोपून खर्डी घराकडे येत असताना सांगोला-जत रोडवरील सांगोल्याकडून भरधाव जाणाऱ्या कंटेनरची (क्र. एमएच ४६ एएफ १०८६) समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. अपघातात किरण गुजले याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला होता, तर गंभीर जखमी अजित मंडले यास तातडीने उपचारासाठी पंढरपूरला, तर अक्षय मलमे पाटील यास उपचारासाठी सांगोल्यात आणताना वाटेतच त्या दोघांचाही मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच फौजदार बाबासाहेब भातुंगडे, पोलीस नाईक डी. बी. भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकामधून उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी मदत केली. याबाबत, नरसिंह आप्पा चव्हाण (रा. खर्डी, ता. पंढरपूर) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी कंटेनरचालक समाधान बाळू कोकरे (रा. घेरडी, मेटकर वस्ती, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार बाबासाहेब भातुंगडे करीत आहेत.